पीसीओडी आयुर्वेदिक दृष्टिकोन

0

लोकशाही विशेष लेख

सध्या क्लिनिकमध्ये रोज एक तरी पेशंट पीसीओडी किंवा पीसीओएस च्या तक्रारी घेऊन येते. पीसीओडी किंवा पीसीओएस हे दोन्ही एकच आहेत पॉलिसीस्टिक ओव्हरिअन डिसिज किंवा पोलिसिस्टिक ओव्हरिअन सिंड्रोम असे याला म्हणतात. हा खरंतर लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणजेच बदललेल्या जीवनशैलीमुळे झालेला विकार आहे . स्त्रियांमध्ये, मुलींमध्ये हार्मोनल असंतुलनामुळे ही लक्षणे दिसून येतात. वय वर्षे 15 ते 45 या वयोगटातील मुली व स्त्रियांमध्ये हा त्रास जास्त प्रमाणात आजकाल दिसून येत आहे. यामध्ये स्त्रीबीज निर्मितीची प्रक्रिया पूर्ण होत नाही असं वारंवार झालं की हे अपूर्ण वाढलेले बीजांड ओवरी म्हणजेच बिजाशय किंवा अंडाशयात साठून राहतात अशी बीजांड साठलेले बिजाशय म्हणजेच पॉलिसिस्टिक ओव्हरी असे म्हणतात. जास्त प्रमाणात एंड्रोजन हार्मोनची निर्मिती झाल्यामुळे हे होत असते.

आता पीसीओडीची कारणे पाहूयात
चुकीची व बदललेली जीवनशैली, अयोग्य आहार, बाहेरचे खाणे, जंक फूड, रात्रीची जागरणे व्यायामाचा अभाव, हार्मोनल पील्सचा गैरवापर, मानसिक ताण तणाव, वाढती व्यसनाधीनता या सगळ्यांमुळे आजकाल पीसीओडीचे वाढते प्रमाण दिसून येत आहे.

आता याची लक्षणे पाहूया
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मासिक पाळी अनियमित होते. त्वचा काळवंडते विशेषतः मानेवर आणि काखेत खूप काळपटपणा येतो. जो कोणत्याही बाह्य उपायाने जात नाही. चेहऱ्यावर पिंपल्स येतात त्याचे डाग पडतात, चेहऱ्यावर अनावश्यक केस येतात विशेषतः दाढी मिशा दिसू लागतात. यालाच हिरसुटिझम असे म्हणतात, वजन खूप वाढते, मूड स्विंग्स होतात, चिडचिड निराशा अनुउत्साह कंटाळा हे सगळे लक्षण दिसू लागतात. तसेच इन्सुलिन रेझिस्टन्स ही होतो‌.

मासिक पाळी जेव्हा नियमित असून योग्य रक्तस्राव होत असतो. तेव्हा शरीर संतुलन टिकून असते, मात्र या कार्यात अडथळा आला की वात पित्त व कफ या तीनही दोषांचे असून तर असंतुलन होते. रसरक्तादी धातूंचे कार्य बिघडते. त्यामुळे वरील सर्व लक्षणे दिसू लागतात. आयुर्वेदानुसार हे त्रिदोषांचे असंतुलन होऊन आमदोष वाढलेला असतो. म्हणजेच विषद्रव्य शरीरात वाढते. त्यामुळे हा आजार होताना दिसतो. आयुर्वेद शास्त्र हे जीवन कसे जगायचे हे शिकवते. शरीर, मन, प्रकृती व आत्मा यांच्यातील संतुलनातून आरोग्यप्राप्ती होते. हे वात पित्त कफाचे असंतुलन दूर करून साठलेले आमदोष म्हणजेच विष द्रव्य शरीराबाहेर काढून शरीरशुद्धी केली. तर या त्रासापासून मुक्तता मिळते.

आयुर्वेद औषधांबरोबरच योग्य आहार मार्गदर्शन लाईफस्टाईल मॅनेजमेंट आणि योग्य व्यायाम यांचा अंतर्भाव रोजच्या जीवनात करणे आवश्यक आहे. आयुर्वेदातील पंचकर्मचिकित्सेचा हार्मोनल असंतुलन दूर करण्यासाठी उत्तम उपयोग होतो यामुळे शरीरातील अनावश्यक दोष शरीराबाहेर काढले जातात आणि संपूर्ण शरीराचे शुद्धीकरण केले जाते.

पीसीओडीसाठी संतुलित आहार कसा असावा तर शक्यतो ऑरगॅनिक भाज्या फळे यांचा वापर करावा ऋतूप्रमाणे फळे घ्यावी सुकामेवा खाताना विशेषतः भिजवलेल्या काळ्या मनुका, अंजीर, बदाम, अक्रोड खारीक व खजूर यांचा वापर करावा. आहारात भरड धान्य म्हणजेच मिलेट्सचा समावेश एकांतरी जेवणात करावाच यामध्ये नाचणी, ज्वारी, बाजरी, राजगिरा हे पदार्थ घ्यावेत. रात्रीचे जेवण लवकर व हलके असावे. बाहेरचे खाणे, जंक फूड, आंबवलेले पदार्थ, मसालेदार पदार्थ, चीज, सॉस, लोणचे, फ्राईज, अति प्रमाणात मांसाहार टाळावा, व्यसनांपासून दूर राहावे. योग्य व्यायाम रोज नियमित करावा यासाठी योगासनांची मदत घ्यावी.

पीसीओडी साठी विशेष उपयोगी आसने सूर्यनमस्कार, भद्रासन, हलासन सेतुबंधासन, शशांक आसन, वक्रासन, अर्धमच्छिंद्रसन नौकासन, सिंहासन, शवासन ही आसने तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावी तसेच प्राणायाम व ध्यानधारणाही करावे. संतुलित आहार आणि योग्य व्यायाम यांचा योग्य वापर करावा. कोणत्याही प्रकारचे डायट फॉलो करताना अतिरेक करू नये एकच एक पदार्थ न खाता संतुलित आहारावर भर द्यावा‌.

आता यासाठी काही घरगुती उपाय व आयुर्वेदिक औषधांची माहिती घेऊया
अनियमित मासिक पाळीसाठी तीळ व गुळाचा काढा करून द्यावा. एक चमचा तीळ, दोन कप, पाण्यात उकळून, एक कप आठवावे व त्यात गूळ घालून तो प्यावा. यामुळे पाळी येण्यास मदत होते आणि पाळीचा स्रावही चांगला होतो. तसेच पोटाला एरंडेल तेल लावून शेकवावे. पाळीच्या आधी पोट दुखत असेल व पाळी येत नसेल, तर रात्री झोपताना घाण्याचे एरंडेल तेल, एक चमचा गरम पाण्यासह त्यात एक चिमूटभर हिंग टाकून घ्यावे. त्यामुळे वातानुलोमन होते व पोट नीट साफ होते आणि पाळी येण्यास मदत होते. अहळीवाची खीर नाश्त्याला खावी त्यामुळे स्त्रीबीज चांगले तयार होऊन, पाळी नियमित होते. रोज सकाळी एक खारीक चावून चावून खावी. जिरे, ओवा, बडीशेप आणि बाळंतशेपा हलकेच भाजून त्याचे चूर्ण करून ठेवावे. यात तिळही घालावे हे एक चमचा चूर्ण दुपारी व रात्री जेवणानंतर खावे.

पीसीओडी मध्ये जास्त रक्तस्त्राव होत असेल तर, तांदळाचे धुवन म्हणजेच तांदूळ धुऊन भिजवलेले पाणी प्यावे आणि दुर्वांचा स्वरस घ्यावा. यामुळे रक्तस्राव कमी होण्यास मदत होते. शतावरी गुळवेल या काही वनस्पतींचा वापर वैद्यांच्या सल्ल्याने करावा. त्यामुळे गर्भाशय व बीजांशय यांचे आरोग्य उत्तम राहते. पीसीओडी मध्ये दोषांचे असंतुलन होऊन शरीरात रुक्षता खूप वाढते. त्यामुळे गाईचे तूप, लोणी यांचा आहारात समावेश हवाच, तसेच किमान आठवड्यातून एकदा तरी अभ्यंग म्हणजेच संपूर्ण शरीराला तेल लावून मसाज करावा व त्यानंतर गरम पाण्याने अंघोळ करावी. मानसिक ताण-तणावामुळे ही पीसीओडी वाढताना दिसतो. यामध्ये मेडिटेशन करावे, आपले छंद जोपासावे तसेच ब्राह्मी, अश्वगंधा, जटामांसी यांचा वापर वैद्यांच्या सल्ल्याने करावा.

रात्री पुरेशी झोप घ्यावी रात्रीची जागरणे टाळावीत
संतुलित आहार योग्य व्यायाम ध्यानधारणा, स्ट्रेस फ्री जीवन, योग्य झोप या सर्वांचा समावेश रोजच्या जीवनात करून जीवनशैली उत्तम ठेवली तर पीसीओडी नक्कीच दूर राहील

 

डॉ लीना बोरुडे
आयुर्वेदाचार्य, पुणे
फोन 9511805298

Leave A Reply

Your email address will not be published.