आयुर्वेदाचा संक्षिप्त इतिहास

0

लोकशाही विशेष लेख

हारीत ऋषि (Harit Rishi) हे सम्राट मांधात्याच्या वंशातील चौथे पुरुष होते. हारीताची आयुर्वेदिय संहिता कायचिकित्सापर होती. याव्यतिरिक्त त्यांचा चिकित्साशास्त्र संग्रह नावाचा ग्रंथ सुद्धा आहे. हरीताचे बारा योग गिरीद्रनाथांनी अधृत केलेले आहेत. आत्रेय ऋषींचे सहावे शिष्य क्षारपाणी हे होत. यांनी कायचिकित्सापर एका तंत्राचे लेखन केले आहे.

चरक संहितेत (सू.३०.२८) आयुर्वेदाचे ज्या क्रमाने वर्णन केले आहे. त्यात दुसरे अंग शालक्य आहे. ‘उधर्वजत्रुगत’ म्हणजे नाक, कान, घसा इत्यादी रोगांच्या चिकित्सेत शलाकेचा उपयोग होत असे, म्हणून त्याला शलाक्य असे नाव पडले. इंद्राचा शिष्यनिमी यांनी शालाक्यतंत्राचे विस्तृत असे ज्ञानभंडार लोकांना पहिल्यांदा उपलब्ध करून दिले. म्हणून त्यांना “आद्यभिषेक” असे नाव मिळाले आहे.

रामायण (Ramayana) व पुराणे यांच्यातील वंशावळी पाहिली निमि हे विदेह राज्याचे संस्थापक होते असे कळते. जनक हे निमिचे पौत्र होय. आयुर्वेदाच्या (Ayurveda) तंत्रात सध्या उपलब्ध नसते तरी त्यातील वचने अन्य ग्रंथात उध्दृत केलेली आढळतात. निमि यांचे शिष्य ” हे शालक्य तंत्रकार असून चरक संहितेतील अक्षिरोग प्रकरणात ‘कराल तंत्र’ याचाच आधार घेतलेला आहे. नेत्ररोग ९६ प्रकारचे आहेत असे ‘कराल’ सांगतात. यानंतरचे शालक्य तंत्रकार ‘शौनक’ यांनाच काही लोक ‘भद्रशौनक’ तर काही लोक ‘शोनक’ व ‘भद्रशोनक’ या भिन्न मानतात. भद्रशौनकाचा आयुर्वेदिक विषय ग्रंथ होता. शौनकाचे तंत्र प्रसिद्ध होते. ‘कांड:कायन’ हे आणखीन एक ‘शालक्य तंत्रकार’ हे बाल्हिक देशाचे रहिवासी असून त्या देशातील एक श्रेष्ठ वैद्य होते. यांचे अनेक शिष्य होते.

गागर्य ऋषींनी धन्वंतरीजवळ (Dhanwantari) शल्य शास्त्राचे अध्ययन करून शालाक्य तंत्राची रचना केली आहे. आयुर्वेदिक शास्त्राच्या ‘शल्यचिकित्सा’ (Surgery) हा तिसरा भाग होय. मानवलोकात सर्वात पहिले दिवोदास धन्वंतरीने शल्य चिकित्सेचा प्रसार केला. धन्वंतरीचे सात प्रमुख शिष्य होते. ‘सुश्रुत’ हे त्यापैकीच एक होत. ते विश्वमित्रांचे पुत्र होते असे सुश्रुत संहितेत सांगितले आहे (चि.२.३) सुश्रुत हे ऋषी असून शालीहोत्राचे चिरंजीव होते असे शालीहोत्र संहितेच्या प्रारंभी लिहिले आहे. हे दुसऱ्या प्रकारचे मत होय. यावरून कदाचित दोन सुश्रुताचार्य असावे असे वाटते. सुश्रुती यांच्या शिष्यांना सौश्रुत असे म्हणत असत. धन्वंतरीकडून मिळालेले शल्यमूलक आयुर्वेदाचे ज्ञान सुश्रुत आचार्यांनी सुश्रुत संहितेत संग्रहित केले आहे. हा ग्रंथ आज सुद्धा उपलब्ध आहे. सुश्रुत, वृद्धसुश्रुत व लघुसुश्रुत हे बहुदा सुश्रुत संहितेचे तीन पाठ असावेत. याव्यतिरिक्त औषधेनव, औरभ्र, पौष्कलावत, हे भगवान धन्वंतरीचे शिष्य असून त्यांनी ग्रंथरचना केलेले आहे. कारवीर्य, गोपूररक्षित, वैतरणा, भोज, भालुकी, दारुक हे सर्व सुश्रुतांच्या नंतर झालेले भीषग असून त्यांचाही ग्रंथ लेखनाचा प्रपंच आहे.

द्वारकाधीश दिगंबर जोशी
संस्कृत अध्यापक
जळगाव
0257-2236815

Leave A Reply

Your email address will not be published.