मजुराने रेल्वेखाली केली आत्महत्या

0

जळगाव :-तालुक्यातील ममुराबाद येथील कृषी विज्ञान केंद्रात कामाला असलेल्या मजूराने कुठल्यातरी नैराश्याखाली आल्यावर विषप्राशन केले. त्याला केंद्रातील कर्मचाऱ्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले होते. तेथे वॉर्डात उपचार सुरु असताना तो पळून गेला. त्यानंतर बजरंग बोगदा परिसरात रेल्वेखाली उडी घेत जीव दिला. याबाबत लोहमार्ग रेल्वे पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अरुण पंडित सूर्यवंशी (वय ४३, रा. अभय कॉलेजजवळ, धुळे) असे मयत इसमाचे नाव आहे. तो आई, पत्नी, २ मुलांसह राहतो. तालुक्यातील ममुराबाद येथील कृषी विज्ञान केंद्रात मजूर म्हणून कामाला होता. ११ डिसेंबर रोजी त्याने विषप्राशन केल्याने कृषी विज्ञान केंद्रातील कर्मचाऱ्यांनी उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सकाळी साडेबारा वाजता दाखल केले. रुग्णालयातील कक्ष क्र. ९ येथे तो ऍडमिट होता. दरम्यान, दुसऱ्या दिवशी दि. १२ डिसेंबर रोजी बाथरूममधून जाऊन येतो असे सांगून अरुण सूर्यवंशी दुपारी ४ वाजेच्या वॉर्डातून निघून गेले.

तेथून ते बजरंग बोगद्याजवळील रेल्वे रुळाजवळ खंबा क्र. ४१८/२३ जवळ आले. तेथे कर्नाटक एक्स्प्रेसखाली स्वतःला झोकून दिल्याने त्यांचा पावणे पाच वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. दुसरीकडे, त्यांच्या परिवाराने त्यांची शोधाशोध केली. मात्र ते मिळून आले नाही. म्हणून त्यांनी १३ डिसेंबर रोजी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला हरविल्याची खबर दिली होती. तर, रेल्वेरुळावर मृतदेह मिळाल्याने लोहमार्ग पोलीस ठाण्याचे कर्मचाऱ्यांकडून या मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरु होते. दरम्यान, दीड दिवसाने दि. १४ रोजी मयताच्या नातेवाईकांनी पोलिसांशी संपर्क साधून सदर इसमाची ओळख पटवली. मयत अरुण सूर्यवंशी याचे शवविच्छेदन झाल्यावर नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.