जाणून घ्या ‘अश्वगंधाचे’ हे बहुमोल फायदे

0

लोकशाही विशेष लेख

 

अश्वगंधा (Ashwagandha) औषधी वनस्पती झुडुप कोरड्या व कमी पावसाच्या प्रदेशात ४-५” उंच वाढते. याच्या पानांवर पांढरी लव असते व खोडावरही केस असतात. याची मुळे मांसल, चिवट, मजबूत व पिळदार असतात. अश्वगंधाच्या मुळ्यांना जगभरातून मागणी येते व ती भारतातील एकट्या मध्यप्रदेशातून (Madhya Pradesh) पुरवली जाते.

फक्त कंद/मुळे. यामध्ये १२ अल्कलॉईडस व ३५ विथॅनोलॉईडस सापडले आहेत. सर्व औषधी गुणधर्माचे आहेत.

गुणधर्म
१) रसाने – मधुर, तुरट व तिखट रस, २) गुणाने स्निग्ध, ३) वीर्याने उष्ण, ४) वात व कफशामक, ५) स्नायूंना ताकद देते, ६) संधिवात प्रतिबंधक, ७) शुक्रधातूवर्धक, ८) वयस्थापक, म्हणजे म्हातारपणाची लक्षणे दूर ठेवून तारुण्य टिकवणे व ९) धातुपौष्टिक.

वापरण्याची पद्धती

१) फक्त अश्वगंधा मुळ्यांचे अर्धा चमचा चूर्ण १ कप दुधात घालून उकळवून त्यात साखर घालून पिणे. किंवा तुपासह सेवन करणे. २) हे चूर्ण इतर औषधींसह वापरतात. उदा. च्यवनप्राश, अश्वगंधारिष्ट इ.

औषधी उपयोग

१) धातूंचे पोषण – आपल्या शरीरात सात धातू असतात, रस, रक्त, मेद, मांस, अस्थि, मज्जा व शुक्र त्या सर्वांचे पोषण अश्वगंधामुळे होते. त्यातही मांस व अस्थि या घन किंवा टणक धातूंवर अश्वगंधा कार्य करते, त्यामुळे ताकद वाढते. त्यामुळे सर्व शक्तिवर्धक वनस्पतींमध्ये अश्वगंधा श्रेष्ठ आहे.

२) वयस्थापन – याचा अर्थ म्हातारपणाची लक्षणे दूर ठेवणे. उदा. त्वचेवरील सुरकुत्या, ताकद कमी होणे इ. त्यामुळे तारुण्य दीर्घकाळ टिकते. हा फायदा घेत असताना अन्य फायदेही व्हावेत यासाठी पुढील वस्तू वापराव्यात – कृती- वयस्थापक मिश्रण एक कप दुधात, अर्धा चमचा शतावरी चूर्ण, अर्धा चमचा अश्वगंधा चूर्ण व अर्धा चमचा ब्राह्मी चूर्ण टाकून उकळवावे. नंतर त्यात साखर घालून सर्व पिऊन टाकावे. यामुळे अश्वगंधा, शतावरी व ब्राह्मी या तिघांचे फायदे एकाच वेळी मिळू शकतात. हे दूध रोज एकदा केव्हाही घ्यावे. शतावरीचे उपयोग मी पुढे सांगणार आहे. तसेच काल मी ब्राह्मीचे उपयोग कसा करावा हे माहिती दिली आहे.

३) फ्री रॅडिकल्सचा नाश – अश्वगंधामध्ये अॅन्टीऑक्सिडंट असतात. ते रक्तातील फ्री रॅडिकल्सचा नाश करतात. त्यामुळे बरेच रोग टळतात.

४) हिमोग्लोबिनची वाढ

५) मॅलॅनिनची वाढ – अश्वगंधामुळे रक्तातील हिमोग्लोबिन व केसांतील मेलॅनिनचे प्रमाण वाढते.
६) रोगप्रतिकारशक्तीत वाढ – अश्वगंधामुळे पेशींच्या कार्यक्षमतेत वाढ होते, जिवाणूंपासून संरक्षण होते व पांढऱ्या पेशींची वाढ होते.याचारही गोष्टींमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते.

७) ताकद व वजन वाढ – अश्वगंधा चूर्ण अनशेपोटी सकाळी दुधासह घ्यावे. याने ताकद वाढते. तसेच लहान मुलांना व अशक्त व्यक्तींना गाईच्या तुपातून दिल्यास वजनही वाढते. यासाठी अश्वगंधा चूर्ण ५० ग्रॅम, गाईचे तूप ५० ग्रॅम व खडिसाखर चूर्ण ५० ग्रॅम यांचे मिश्रण करून ठेवावे. रोज एक चमचा मिश्रण खाल्ल्यास ते तीस दिवसपर्यंत पुरते. आता वजनाची नोंद करावी व पुढे आवश्यकता वाटल्यास सात दिवसांनी पुन्हा हे मिश्रण बनवून एक महिना घ्यावे. (अशक्त माणसाचे ताकंद व वजन वाढण्यासाठी) सांधेदुखी – गुडघ्यांना सूज येणे, गुडघे दुखणे, अशा वातविकारात रोज १ च. अश्वगंधा चूर्ण १ कप दुधातून रोज दोन वेळा घ्यावे.

८) ताणतणाव कमी करते– ताणतणाव व उच्च रक्तदाब अश्वगंधा मज्जातंतूंना शक्ती देते. त्यामुळे अस्वस्थता कमी होते. ताणतणाव कमी होतो, उच्च रक्तदाब कमी होतो, भ्रम व झोप न येणे यात उपयोग होतो.

९) शुक्रधातुवर्धक – २००४ साली प्रसिद्ध केलेल्या एका अभ्यासात १०१ पुरुषांना एक वर्षभर अश्वगंधा दिल्यामुळे त्यांच्यापैकी ७०% पुरुषांचे कामजीवन सुधारल्याचे आढळले, वीर्यासंबंधीच्या समस्या दूर होतात.

सूचना – अश्वगंधा सेवन करताना सर्दी झाली. तर एका वेळी घ्यायचे चूर्ण एक चमच्याऐवजी अर्धा चमचा वा त्याहून कमी घ्यावे. शिवाय रात्री झोपताना अर्धा ते एक चमचा त्रिफळा चूर्ण गरम पाण्यासह घ्यावे.

संतोष ढगे, सांगली
८२०८४२६४९४

Leave A Reply

Your email address will not be published.