पोलिसांच्या वेशात येऊन शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा आत्मदहनाचा प्रयत्न

0

बुलढाणा , लोकशाही न्यूज नेटवर्क

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यानंतर तुपकर यांनी पोलिसांच्या वेशात येत येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. या घटनेनंतर येथे एकच खळबळ उडाली असून, सध्या येथे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये शाब्दीक चकमक सुरू होती.

सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीसाठी रविकांत तुपकर यांनी टोकाची भूमिका घेत शनिवार, ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय किंवा AIC पिकविमा कंपनीच्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, मुंबई येथील कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे रविकांत तुपकरांनी जाहीर केले होते.

मात्र नेमके बुलडाण्यात की मुंबईत कुठे आत्मदहन करणार ? हे मात्र त्यांनी गुलदस्त्यात ठेवले होते. एकतर आमच्या मागण्या मान्य करून आम्हाला जगू द्या, नाहीतर आम्हाला आत्मदहन करू द्या. तेही करू देणार नसाल तर पोलिसांच्या बंदुकीच्या गोळ्या घालून आम्हाला ठार करा. अशी भूमिका या आंदोलनाबाबत तुपकरानी मांडली आहे.दरम्यान, तुपकरांच्या या भूमिकेमुळे संपूर्ण पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले होते. तसेच पोलिसांनी तुपकरांना नोटीसदेखील बजावली होती.तीन दिवसांपासून ते भूमिगत होते. त्यानंतर आज तुपकरांनी पोलिसांच्या वेशात बुलडाणा जिल्हाधिकारी परिसरात दाखल होते स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यामुळे येथे एकच खळबळ उडाली आहे.

प्रमुख मागण्या

सोयाबीन आणि कापूस दरवाढीचा मुख्य प्रश्न आहे. त्यासाठी कापूस, सूत व डीओसी तसेच सरकीची ढेप निर्यात करण्याला प्रोत्साहन द्यावे, सोयापेंड आयात करु नये, यंदा १५ लाख मेट्रिक टन सोयापेंड निर्यात करावी, खाद्य तेलांवरील आयात शुल्क ३० टक्के करावे, कापसाचे आयात शुल्क २० टक्के करावे, जी. एम. सोयाबीनच्या लागवडीला परवानगी द्यावी, सोयाबीनवरील पाच टक्के जीएसटी रद्द करावा, या मागण्याकडेही सरकार गांभीर्याने पहायला तयार नाही, अशी भूमिका तुपकरांनी मांडली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.