आधी आगीतून बचावला ; मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात जीव गमावला !

0

चोपडा येथे आगीत तरुणाचा होरपळून मृत्यू ; घटनेमुळे हळहळ

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

पहाटे कापड दुकानाला लागलेल्या भीषण आगीत इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यापर्यंत आग लागल्याने नागरिक आणि अग्निशामक दलाच्या प्रयत्नाने अनेकांना बाहेर सुखरूप काढण्यात यश आले असताना आपला मुलगा आगीच्या ठिकाणी राहून गेल्याचा विचार मनात आल्याने बापाने आगीच्या ठिकाणी धाव घेऊन मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात त्या तरुणाचा गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना चोपडा शहरात शुक्रवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास घडली असून या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

गौरव सुरेश राखेचा (30) असे या मृत तरुणाचे नाव आहे. तर सुदैवाने कुटूंब बचावले. चोपडा शहरातील मेन रोडवरील राहुल एम्पोरीयम या दुकानात शनिवारी २ ते अडीच वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. तळ मजल्यावर कापड दुकान, दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर रहिवास असणाऱ्या मेनरोड वरील राहुल एम्पोरिएम या तीन मजली इमारतीस आग लागल्याने आग तिसऱ्या मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली. या आगीतून सुरेश राखेचा व कविता राखीचा यांना घरातून निघण्यात यश आले.

यात कविता राखेचा या जखमी झाल्या आहेत. परंतु वरच्या मजल्यावर गौरव राखेचा आणि त्याची पत्नी मोना राखेचा, संकेत राखेचा, शुभम राखेचा व लहान बाळ गौरव असे चारही जण वरच्या रूममध्ये अडकून होते. नगरपालिकेचे कर्मचारी व स्थानिक लोकांनी सर्वात अगोदर शुभम राखेचा यांना बाहेर काढण्यात यश मिळवले. त्यानंतर संकेत राखेचा, मोना राखेचा व लहान बाळाला काढण्यात यश आले. परंतू संकेत वरती अडकून आहे, या विचाराने गौरव राखेचा आपल्या पत्नीला सोडून परत वरती गेला. पण तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते.मात्र गौरव हा जीव वाचवण्यासाठी इतरत्र जागा शोधण्याच्या नादात बेडरूम मधून बाथरूम मध्ये थांबला. तिथेच त्याचा घात झाला.सकाळी सहा वाजता बाथरूममध्ये जळालेल्या स्थितीत त्याचा मृतदेह आढळला. परंतू आग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे गौरवचा बाथरूममध्ये गुदमरूम मृत्यू झाला.

या आगीत इमारतीचे दोनही मजले जळून खाक झाले आहेत.आग इतकी तीव्र होती की घरातील पीओपी,घरातील, जिन्यातील फरशा, किचन ओटा, भांडी जळून कोळसा झाले आहेत. तसेच सोफ्याच्या ड्रावरमध्ये ठेवलेली नोटांची बंडल जळाली. नागरिकांनी अथक परिश्रम करून सर्वांना सुखरूप काढण्यासाठी प्रयत्न केले. परंतु आगीत अखेर गौरवचा मृत्यू झाला. आगीत नगरपालिका कर्मचारी बडगुजर हे देखील जखमी झाले आहेत. घराचे व दुकानाचे पूर्ण साहित्य जळून खाक झाले असून यात लाखोंचे नुकसान झाले आहे.

घटनास्थळी एपीआय अजित साबळे व त्यांचे कर्मचारी यांनी प्रयत्न केले. . चोपडा पीपल बँक चेअरमन चंद्रासभाई गुजराती, संचालक जैन, राजूभाऊ बिटवा, अजय भाऊ राजपूत, सागर ने,वे मयंक जैन, निर्मल बोरा आदींनीही मदत केली. तर यावल, धरणगाव, पारोळा, शिरपूर, अमळनेर व जळगांव येथून अग्निशमन दलाच्या बंब मागवण्यात आल्या होत्या.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.