अमळनेर – : शहरातील लक्झरी मालकावर चाकूने जीवघेणा हल्ला करून फरार झालेल्या सराईत गुन्हेगार दाऊद उर्फ शुभम देशमुख याला अटक करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी शुभम देशमुख उर्फ दाऊद याने जयवंत पाटील या लक्झरी मालकाशी वाद घालून त्यांच्या पोटात चाकू मारला होता. यात जयवंत पाटील याला गंभीर जखमा झाल्या होत्या. हल्ला केल्यानंतर शुभम देशमुख फरार झाला होता. तो अनेकदा शहरात आल्याची चर्चा होती. मात्र, पोलिसांच्या हातात तो लागत नव्हता डीवायएसपी सुनील नंदवाळकर यांना शुभम देशमुख हा धुळे येथील मालेगाव रस्त्यावर खान्देश खानावळीत जेवण करत असल्याची गोपनीय माहिती दिली. नंदवाळकर यांनी तातडीने पोलीस निरीक्षक विकास देवरे यांना शुभमला अटक करण्यासाठी पथक पाठवण्याचे आदेश दिले होते. देवरे यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक अजित सावळे, अमोल पाटील, जितेंद्र निकुंभे, नीलेश मोरे, सागर साळुंखे, मधुकर पाटील यांच्या पथकाला रवाना केले. तोपर्यंत दाऊद तेथून पळून जाऊ नये म्हणून त्याला ताब्यात घेण्यासाठी नंदवाळकर यांनी धुळ्यातील आझाद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस गौतम राजेंद्र सपकाळे, अझरुद्दीन जयरोद्दीन शेख यांना पाठवले. धुळे पोलिसांनी त्यास ताब्यात घेतल्यानंतर अमळनेर पोलिसांनी शुभम उर्फ दाऊदला अटक केली.