९७व्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला उपमुख्यमंत्री अजित पवार राहणार उपस्थित…

0

 

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

अमळनेर येथे होत असलेल्या ९७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपस्थित राहणार आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे, कार्याध्यक्षा प्रा.डॉ. उज्ज्वला मेहंदळे व संमेलनाचे समन्वयक प्रा.डॉ.नरेंद्र पाठक यांनी मुंबईत ना. पवार यांची भेट घेवून साहित्य संमेलनाचे निमंत्रण दिले.

यावेळी ना.अजित पवार म्हणाले की, आदरतिथ्याच्या बाबतीत जळगावचे नाव नेहमीच आदराने घेतले जाते. यामुळे साने गुरुजींच्या कर्मभूमीत होत असलेले साहित्य संमेलन निश्चितच यशस्वी ठरेल. संमेलनाचे निमंत्रक तथा पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यासाठी विशेष मेहनत घेत असून त्यांच्या माध्यमातून साहित्य संमेलनाच्या तयारीची माहिती मी नियमितपणे घेत असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

खान्देशाला मोठी साहित्यिक परंपरा आहे. ही परंपरा ९७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अजून बळकट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. चर्चेदरम्यान ना.पवार यांनी संमेलनाच्या तयारीची सविस्तर माहिती घेत कामाबद्दल समाधान व्यक्त केले. संमेलनासाठी राज्य शासनातर्फे सर्वोतोपरी मदत करण्यात येईल, असे सांगत संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.