खा. उन्मेष पाटील, करण पवार हाती मशाल घेणार ?

0

 

लोकशाही संपादकीय लेख

 

भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांची जळगाव मतदार संघातून उमेदवारी कापून माजी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केल्यापासून खासदार उन्मेष पाटील कमालीचे नाराज होते. स्थानिक राजकारणातून त्यांचा बळी घेण्यात आला. हे उन्मेष पाटलांसह त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांना आपल्या भावना दुखावल्यासारखे होते. जळगाव लोकसभा मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील उद्धव ठाकरे गटाच्या वाट्याला आली आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि उन्मेष पाटील यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून संवाद चाललेला होता. अखेर काल खासदार उन्मेष पाटील यांना मुंबईतून मातोश्री मधून बाहेर पडताना पत्रकारांनी गाठले. तेव्हा “राजकारणाच्या पलीकडे जाऊन मैत्रीचे काही नातेसंबंध असतात. त्या मैत्री पोटी मातोश्रीवर जाऊन खासदार संजय राऊत आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली”, असे उत्तर देऊन खासदार पाटलांनी आपली बाजू पुढे केली. परंतु आतली बातमी अशी की ‘आज बुधवारी खासदार उन्मेष पाटील हे आपल्या समर्थक कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे समजते.’ दरम्यान खासदार उन्मेष पाटील यांची भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी समदूत काढण्याचा प्रयत्न केल्याचे देखील कळते. त्यामुळे उन्मेष पाटलांचा शिवसेना प्रवेश निश्चित समजला जातो आहे. खासदार उन्मेष पाटील यांच्या शिवसेनेत प्रवेश हा भाजपसाठी फार मोठा धक्का राहील एवढे मात्र निश्चित.. पारोळा भडगाव विधानसभा प्रमुख माजी नगराध्यक्ष करण पवार हे सुद्धा भाजपला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे. करण पवार यांना २०२४ लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मिळण्याची शक्यता वाटत नाही. तथापि आगामी विधानसभा निवडणुकीत लक्ष केंद्रित करण्यासाठी पारोळा एरंडोल विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे उमेदवारी मिळावी म्हणून आतापासूनच ती तयारी सुरू असल्याचे कळते. पाचोरा एरंडोल मतदारसंघातील विद्यमान शिवसेना आमदार चिमणराव पाटील हे शिंदे यांच्या शिवसेनेत गेले. त्यामुळे त्यांना तगडा पर्यायी उमेदवार म्हणून शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे तयारी करण्यात येत असल्याचेही कळते. खासदार उन्मेष पाटील आणि करण पवार यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आणखी काही नेते व कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे समजते.

 

खासदार उन्मेष पाटलांच्या प्रवेशानंतर येत्या ५ एप्रिल रोजी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची जळगाव ही भव्य जाहीर सभा होणार आहे. त्या जाहीर सभेत जळगाव लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवारांचे नाव जाहीर करण्यात येणार असल्याचे कळते. जर खासदार उन्मेष पाटील यांचे नाव जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी घोषित झाले तर भाजप विरुद्ध शिवसेना अर्थात महायुती विरुद्ध महाविकास आघाडीच्या उमेदवारात कमालीची लढत होऊ शकते. लोकसभा निवडणुकीनंतर लगेच महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका जाहीर होतील. आगामी विधानसभा निवडणुका मात्र चांगली रंगात येणार आहे. विधानसभा निवडणुकीत बरेच काही वेगळे चित्र पाहायला मिळणार आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपतर्फे उमेदवारी मिळावी म्हणून प्रबळ इच्छा असलेले प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष रोहित निकम यांनी जळगाव विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक असल्याचे सांगितले आहे. तसेच याबाबत श्रेष्ठींकडून त्यांना आश्वासनही देण्यात आल्याचे कळते. जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आमदार राजू मामा भोळे यांचे काय? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. तीच परिस्थिती काँग्रेस मधून भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील यांची कन्या डॉक्टर केतकी पाटील यांचा सुद्धा आहे. रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडून निवडणूक लढवण्यासाठी ते इच्छुक होत्या. तथापि त्यांचे ऐवजी विद्यमान खासदार रक्षा खडसे यांचे भाजपतर्फे उमेदवारी मिळाल्याने केतकी पाटील यांचे तिकीट कापले. त्यासुद्धा आगामी विधानसभेसाठी निवडणूक लढविण्यास इच्छुक असून त्यांना कोणत्या विधानसभे मतदारसंघासाठी उमेदवारी द्यावी, हा भाजप पुढे प्रश्न राहील. कारण यावल रावेर लोकसभा मतदार संघातून त्यांना उमेदवारी हवी आहे. तथापि भाजपचे जिल्हाध्यक्ष कै. हरिभाऊ जावळे यांचे सुपुत्र अमोल जावळे यांना रावेर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली नसल्याने त्यांना यावल रावेर लोकसभा मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी भाजप देईल. त्यामुळे डॉक्टर केतकी पाटलांसाठी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी नवा मतदार संघ शोधायला पाहिजे. त्यामुळे आताच्या लोकसभा निवडणुकीपेक्षा आगामी विधानसभा निवडणुका अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता आहे…!

Leave A Reply

Your email address will not be published.