युवकांचे मानसशास्त्र….. प्रेम..!

0

लोकशाही विशेष लेख

 

सर्वात चांगला भाव, सर्वात चांगला शब्द, सर्वात चांगली पवित्र भावना म्हणजे ‘प्रेम’ होय. ‘प्रेम’ या अडीच अक्षरी शब्दाने संपूर्ण युगानुयुग व्यापून टाकले आहे. प्रेम हा शब्द जितक्यादा म्हणावा, ऐकावा, लिहावा तितका व्यक्ती अधिक पवित्र बनत जातो. प्रेम या भावनेच्या छटा या मात्र वेगवेगळ्या आहेत. हंबरणाऱ्या गाईने तिच्या वासरावर केलेले प्रेम, आईचे तिच्या परिवारावर असणारे प्रेम, गुरुचे शिष्यावर, शिष्याचे गुरुवर असणारे प्रेम, सैनिकाचे त्याच्या देशावर असणारे प्रेम, कलाकाराचे त्याच्या कलेवर असणारे प्रेम.. प्रेम या शब्दामध्ये गणितातली वजाबाकी ही नाही. त्यात आहे फक्त आणि फक्त गुणाकार, भागाकार ज्याच्या वाटेला जितके अधिकाअधिक प्रेम आले तो तितका नशीबवान. संपत्तीच्या अलीबाबाच्या खजिना पेक्षा कितीतरी पटीने मौल्यवान खजाना म्हणजे प्रेम.

प्रेम ही भावना देवाला सर्वात अधिक प्रिय आहे. प्रेम म्हणजे तन्मयता, प्रेम म्हणजे तल्लीनता. मीराबाईचे प्रेम, भक्त प्रल्हादावर भगवंताने केलेले प्रेम, संत गोरा कुंभाराचे देवाच्या अभंग वाणीवर असणारे प्रेम. प्रेम म्हणजे भक्ती आणि श्रद्धा. म्हणूनच येशू ख्रिस्त बायबल मधील ग्रंथांमध्ये वर्णन करीत असताना स्वतः अनुभव कथन करतात की, ‘मला कुणी जवळ घेतले नाही. मला कोणी चुंबन दिले नाही.’ असा जीवन वर्णन प्रवास आहे. तर भगवान श्रीकृष्णाच्या गवळणी सोबत रचलेल्या रासलीला सर्व कथाकार, कीर्तनकार, बुवा महाराज लोक वर्णन करीत समाजात मुक्तपणे आनंदाची निर्मिती करतात. इतिहासामध्ये प्रेमाखातर शहाजाननी मुमताजसाठी भारतातच ताजमहाल बनविला.

सदरच्या लेखाचे महाविद्यालयात लिखाण सुरू असताना महाविद्यालयातील एक युवती आली. तिने विचारले सर काय करत आहात.? काय लिहित आहात? हातातील कागद वाचून दाखवल्यावर तिची खात्री पटली की, सर निश्चित प्रेमपत्र तर लिहितच नाही. मग हळूच गालावरती अल्हाद खळी पाडत स्मित हास्य करीत दबक्या आवाजात बोलली की “युवकांच्या प्रेमाबाबत मानसशास्त्रात काय सांगितले आहे”…. तिला सांगितले प्रेम हा विषय मानसशास्त्रात अभ्यासासाठीचा स्वातंत्र्य विषय आहे. अगोदर मानसशास्त्र हा विषय अभ्यासासाठी घे.

प्रेम म्हणजे मैत्री, दोन परस्पर विरुद्ध लिंग असणाऱ्या व्यक्तींमध्ये प्रामुख्याने आकर्षणातून प्रेम हे वाढत जातं. एक समान लिंग असणाऱ्या स्त्री-पुरुषातील आकर्षणातून जवळीकता निर्माण होणे त्यांच्यात शारीरिक संबंध असणे ही बाब अनैसर्गिक. प्रेमात असणारे मुले मुली लोहचुंबकाकडे ज्याप्रमाणे एखाद्या धातू हा आकर्षला जातो, चिकटतो त्याप्रमाणे हे मुलं मुली एकमेकांकडे आकर्षले जातात. प्रेमाला खरंतर ‘परा मानसशास्त्राचा’ भक्कम आधार आहे. परा मानसशास्त्रमध्ये व्यक्ती वर्तनाचा संबंध हा पूर्व जन्माशी लावला जातो. प्रेम म्हणजे शक्ती, प्रेम म्हणजे युक्ती, प्रेम म्हणजे रिद्धी, प्रेम म्हणजे सिद्धी, प्रेम म्हणजे आत्मविश्वास, प्रेम म्हणजे लढाई आणि प्रेम म्हणजे महायुद्ध. प्रेम म्हणजे काही वेळेला सक्ती आणि दुःख, सोबत यातना. प्रेम म्हणजे सदा सर्वकाळ दळवळणारा सुगंध, प्रेम म्हणजे सर्व प्रकारचे समाधान, सुख होय.

खरंतर युवा अवस्थेतील मुलं आणि मुली या प्रेमामध्ये शारीरिक वाढीनुसार स्वाभाविकपणे शरीरा अंतर्गत घडणाऱ्या रासायनिक बदलामुळे परस्पर विरुद्ध लिंग असणाऱ्यांकडे आकर्षिले जातात. त्यांच्यात हे आकर्षण निर्माण होत नाही, त्यांच्या शरीर विकास क्रियेत कमी अधिक प्रमाणात दोष असतात. व्यक्ती आला म्हणजे प्रेम ही भावना आली कवी मंगेश पाडगावकर कवितेत लिहितात “प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं….”

बरं का मित्र आणि मैत्रिणींनो प्रेम म्हणजे विकृती आणि दुर्गंधी नसते. बऱ्याच वेळी एकतर्फी प्रेमामधून समाजामध्ये अप्रिय घटना घडल्याचे ऐकायला येते. त्यात ॲसिड हल्ला, समोरच्या प्रियकर प्रियसीला नाहक त्रास देणे, आत्महत्या करणे, या गोष्टी प्रेम भावनेत येत नाही. प्रेमामध्ये व्यक्ती एकमेकांना न्याहाळतात, त्यांची काळजी घेतात, आपल्या ताटातील घास एकमेकांना भरवितात. कवी कुसुमाग्रज त्यांच्या कवितेत लिहिता. “प्रेम कर भिल्लासारखं.. पुरे झाले चंद्र पूरे झाले सूर्य.. पुऱ्या झाल्या तारा पुरे झाले नदी नाले.. मोरासारखा छाती काढून उभा राहा जरा..”

प्रेमभंग ही एक उच्च कोटीची मानसिक अनुभूती आहे. या प्रेमभांगामधून महापुरुषांनी जगविख्यात काव्याची निर्मिती केली. उत्तम वास्तु, साम्राज्याची निर्मिती केली. प्रेम भंग म्हणजे एक उच्च कोटीची आत्मिक शक्ती. या शक्तीचा सकारात्मक रचनात्मक दृष्टीने वापर करणे हे आजच्या युगातील आपण सर्व युवक आणि युवतीने शिकले पाहिजे. ते कौशल्य समाज विकासासाठी आत्मसात केले पाहिजे. समाजाने ते स्वीकारले पाहिजे. नाहक अशा युवा युतींवर टीका करणे टाळले पाहिजे.

ढाई अक्षर प्रेम के या चित्रपटात ऐश्वर्या राय “आ..आ…आ करत गाणं गाते दो लब्जो मे लिख दू तुझको अपनी प्रेम कहानी तू मेरे दिल का राजा बन जा मै तेरे दिल की रानी…” आपण मागील लेखात सुचवल्याप्रमाणे सौदागर हा चित्रपट निश्चित बघितला असेल. त्या आय. लव. यू… इलू इलू .. का मतलब आता समजला तुम्हाला सर्वांना. प्रेम म्हणजे “आय लव यू…. ” म्हणूनच साने गुरुजी म्हणतात खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे… कुठल्याही पद्धतीने सैराट चित्रपटांसारख्या प्रेम कहाण्या आदर्श म्हणून आपल्या डोळ्यासमोर युवकांनी ठेवता कामा नये..

नेता हा जनतेचा असतो. जनता ही नेत्यावर प्रेम करते. आणि नेता हा जनतेवर प्रेम करतो. म्हणूनच जिल्ह्यातील लोक नेतृत्व करणाऱ्या पुढारी, आमदार, खासदार, अधिकारी यांची प्रेमप्रकरणे चर्चेला घेणे, सदरचे विषय हे सार्वत्रिक करणे, हा कुठल्याही परिस्थितीत वैयक्तिक विषय होऊ शकत नाही. तो त्या नेत्यांच्या चरित्राचा लोक जीवनाचा भाग आहे. कारण नेत्याचे अनुकरण बहुसंख्य लोक करतात. म्हणून तो नेता असतो. लेखकाच्या व्यक्तिगत प्रेमावर आणि संबंधांवर टीका करणे ही बाब शिक्षेस पात्र आहे. भगवान श्रीकृष्ण, भगवान शिवशंकर यांची प्रेमप्रकरणे होतीच की…!

प्रो. डॉ. आशिष एस. जाधव/बडगुजर.
पंकज कला वरिष्ठ महाविद्यालय, चोपडा.
9373681376

Leave A Reply

Your email address will not be published.