खडकी येथील तरुणाचा डंपर खाली येऊन दुर्दैवी मृत्यू…

0

 

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

पत्नीला घेऊन मोटरसायकलवर चाळीसगावच्या दिशेने निघालेल्या खडकी ता. चाळीसगाव येथील तरुणाची मोटरसायकल पाचोरा तालुक्यातील सांगवी गावानजीक गतिरोधकावर आदळल्याने घसरली, त्याचवेळी कुऱ्हाडच्या दिशेने जाणाऱ्या डंपरच्या मागील चाकाखाली आल्याने, तरुणाचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल त्यांनी घटनेबाबत पंचनामा करत डंपर चालका विरुध्द गुन्हा नोंदविला आहे.

याबाबत प्राप्त माहिती अशी की, संदिप राजेंद्र सुर्यवंशी (मराठे) वय – ३३ हा तरुण आई व पत्नीसह खडकी ता. चाळीसगाव येथे वास्तव्यास आहे. संदिप हा ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास त्याची पत्नी गायत्री हिच्या सोबत, खडकी ता. चाळीसगाव येथून मोटरसायकल क्रं. एम. एच. १९ डी. क्यु. १८५९ ने जामनेर येथे जाण्यासाठी निघाला. जामनेर येथील रुग्णालयातील काम आटोपून पाचोऱ्याच्या दिशेने येत असतांनाच, सांगवी ता. पाचोरा गावानजीक बस स्थानकाजवळ संदिप याची मोटरसायकल गतिरोधक वर आदळल्याने मोटरसायकलचे नियंत्रण सुटले व मोटरसायकल घसरली. यावेळी पत्नी गायत्री ही विरुध्द बाजूला पडली मात्र संदिप हा रस्त्यावरच पडल्याने त्याचवेळी कुऱ्हाडच्या दिशेने धरधाव वेगात जाणाऱ्या डंपर (क्रं. एम. एच. ४६ – एफ. ७८२४) च्या मागील चाकाखाली सापडून संदिप याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी अरविंद मोरे, शैलेंद्र चव्हाण हे घटनास्थळी दाखल होवून घटनास्थळाचा पंचनामा करून, त्यांनी संदिप याचा मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. पोलिसांनी डंपर ताब्यात घेतले असून, घटनेप्रकरणी पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनमध्ये अपघाताचा गुन्हा नोंदविण्यात आला. या घटनेचा पुढील तपास स.पो.नि. महेंद्र वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल अरविंद मोरे व शैलेंद्र चव्हाण हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.