दुचाकीच्या जोरदार धडकेत मजूराचा मृत्यू

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

रस्त्याने पायी जाणाऱ्या मजूराला भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीने धडक दिल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नामदेव श्रावण सोळंके (वय ४३) असे मयत मजुराचे नाव आहे. नामदेव सोळंके हे यावल तालुक्यातील कोळन्हावी येथे मजुरीकाम करुन उदरनिर्वाह भागवायचे. ९ एप्रिल रोजी कामानिमित्ताने ते विदगाव कोळन्हावी रोडने पायी जात असतांना त्यांना समोरुन एम.एच. १९ बी.पी.९९६४ या क्रमाकांच्या दुचाकीने धड‍क दिली होती.

या धडकेत नामदेव सोळंके यांच्या डोक्याला आणि तोंडावर गंभीर दुखापत झाली होती. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातानंतर दुचाकीस्वार घटनास्थळावरुन पसार झाला होता.

मयताच्या पश्चात पत्नी मंगलाबाई, बादल व सौरभ हे दोन मुले असा परिवार आहे. याप्रकरणी मयत नामदेव सोळंके यांचा मुलगा बादल सोळंके (वय १९) याने दिलेल्या तक्रारीवरुन सोमवार, २५ एप्रिल रोजी दुचाकीस्वार सचिन दिनकर सावळे चुंचाळे ता. यावल याच्यावर जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक फौजदार माणीक सपकाळे हे करीत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.