मिरजजवळ ट्रक्टर-बोलेरोची धडक ; एकाच कुटुंबातील तिघांसह सहा ठार

0

सांगली , लोकशाही न्यूज नेटवर्क
रत्नागिरी-नागपूर महामार्गावर आज सकाळी बोलेरो जीप आणि विटांनी भरलेल्या ट्रक्टरची समोरासमोर धडक होऊन सहाजण ठार झाल्याची दुर्घटना मिरज तालुक्यातील वड्डी गावाजवळ घडली.

राधानगरी तालुक्यातील सरवडे येथील पोवार कुटुंबीय आणि त्यांचे नातेवाईक पंढरपूरला दर्शनासाठी निघाले होते. मिरजजवळ काळाने त्यांच्यावर घाला घातला. अपघाताची माहिती समजताच सरवडे येथील सर्व व्यवहार बंद करण्यात आले. या संपूर्ण परिसरात शोककळा पसरली होती.

जयवंत दत्तात्रय पोवार (वय 45), स्नेहल जयवंत पोवार (वय 40), सोहम जयवंत पोवार (वय 12) (तिघेही रा. सरवडे, ता. राधानगरी), सासू कमल श्रीकांत शिंदे (वय 60, रा. इचलकरंजी), लक्ष्मण शिंदे (वय 70, रा. बानगे, ता. भुदरगड), चालक उमेश शर्मा (वय 35, मूळ रा. बिहार, सध्या शेळेवाडी, ता. राधानगरी) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर साक्षी जयवंत पोवार (वय 18), श्रावणी जयवंत पोवार (वय 16) या दोघी बहिणी गंभीर जखमी झाल्या आहेत.

राधानगरी तालुक्यातील सरवडे येथील जयवंत दत्तात्रय पोवार कुटुंबासह आज सकाळी बोलेरे जीपमधून पंढरपूरला देवदर्शनासाठी जात होते. आज सकाळी मिरजनजीक रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव बोलेरो जीप आणि विटा घेऊन निघालेल्या ट्रक्टरची समोरासमोर धडक झाली. या अपघातात सहाजण ठार झाले, तर दोन मुली जखमी झाल्या. बोलेरोमधून आठजण प्रवास करीत होते. जखमींवर मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रत्नागिरी-नागपूर या महामार्गावरील बायपास रस्ता कालच वाहतुकीसाठी सुरू झाला आहे. या रस्त्यावर वड्डीनजीकच्या राजीव गांधीनगर येथे ट्रक्टर विरुद्ध दिशेने आल्याने बोलेरो जीपने त्याला धडक दिली. या धडकेत बोलेरो जीपमधील तीन पुरुष, दोन महिला जागीच ठार झाल्या. उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच मित्रमंडळी व नातेवाईक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमी दोन मुलींवर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर मृत सहाजणांची उत्तरीय तपासणी करण्यात आली. घटनास्थळी सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, उपअधीक्षक अजित टिके, ग्रामीणचे पोलीस निरीक्षक देशमुख, महात्मा गांधी चौकीचे भालेराव यांच्यासह पोलीस दाखल झाले. पोलिसांनी तातडीने वाहतूक सुरळीत करत जखमींना रुग्णालयात हलविले.

रत्नागिरी-नागपूर या महामार्गावर कालच वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मात्र, दिशादर्शक फलक नसल्याने वाहने अचानक एकमेकांसमोर येण्याचे प्रकार घडत आहेत. विटांनी भरलेला ट्रक्टरही आज असाच चुकीच्या दिशेने अचानक समोर आल्याने भरधाव बोलेरो जीपची धडक झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.