बालपणीचा गणेशोत्सवाचा उत्साह आयुष्यभर लक्षात राहणारा : डॉ. अविनाश कुलकर्णी

कोरोनात हाताने गणेश मूर्ती बनवून विघ्न घालवण्यासाठीची प्रार्थना अविस्मरणीय : डॉ. उमेश वाणी

0

आठवणीतील गणेशोत्सव

डॉ. अविनाश कुलकर्णी

वास्तुशास्त्र व वास्तु ऊर्जा तज्ञ

 

डॉ. उमेश वाणी, प्राध्यापक

लोकसेवक मधुकरराव चौधरी,

समाजकार्य महाविद्यालय

 

ॲड. नितीन अट्रावलकर

शेखर अकोले, सोने-चांदी व्यावसायिक

 

बालपणी गणेशोत्सव म्हटला म्हणजे तो उत्साह निराळाच असायचा. ते दिवस आणि त्या आठवणी आयुष्यभर लक्षात राहणाऱ्या आहेत. मी बळीराम पेठेत चांदोरकर वाड्यात राहायचो. तेथील दत्त गणेश मंडळ मला आजही आठवतं. त्या मंडळाच्या गणेशाच्या स्थापनेसाठी आम्ही वर्गणी गोळा करत फिरायचो. वीस पैसे, पंचवीस पैसे, पन्नास पैसे अशी वर्गणी मिळायची. सर्वात मोठी वर्गणी पाच रुपये ही खूप मोठी वाटायची. त्यावेळी मिळालेल्या वर्गणी नुसार अकरा रुपयाचा गणपती घ्यायचा की, पंधरा रुपयाचा गणपती घ्यायचा यावरून जोरदार चर्चा चालायची. आम्ही रोज जुन्या भाजी मार्केटमध्ये जाऊन गणेशाची आकर्षक मूर्ती शोधायला जायचो. बजेट वाढला की पुन्हा फेरफटका मारायचो. त्या बालपणीच्या आठवणी आयुष्यभर स्मरणात राहणाऱ्या आहेत, अशी आठवण वास्तू आरोग्यमचे संचालक तथा वास्तुशास्त्र व वास्तूएनर्जी तज्ञ डॉ. अविनाश कुलकर्णी यांनी सांगितली.

ते लोकशाहीच्या कार्यालयात सायंकाळच्या आरतीसाठी उपस्थित होते. दैनिक लोकशाहीच्या कार्यालयात दरवर्षीप्रमाणे शहरातील उच्चपदस्थ व्यक्तींच्या हातून श्री गणरायाची सायंकाळची आरती करण्याचा उपक्रम राबविला जात आहे. यामध्ये काल आरतीसाठी ते उपस्थित होते. डॉ. अविनाश कुलकर्णी यांच्यासह धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य विद्यालयाचे प्राध्यापक डॉ. उमेश वाणी हे देखील उपस्थित होते. यावेळी दोघांनी आपल्या आठवणीतील गणपती बद्दल माहिती कथन केली.

यावेळी पुढे बोलताना डॉ. अविनाश चौधरी म्हणाले बालपणी आम्ही गणपतीसाठी आरास तयार करायचो. डोंगर तयार करणे, त्यावर मोहरी गहू टाकून शेत तयार करणे, तेव्हा भारत चीन युद्ध विशेष प्रसिद्ध होतं. त्यामुळे प्लास्टिकचे सैन्य उभारून आम्ही देखावा निर्माण करायचो. त्या काळात प्रमोशन साठी आता सारख्या होर्डिंग वगैरे लावायला पैसा नसायचा. त्यावेळी आम्ही सिमेंटच्या रोडवर आपापल्या मंडळाची नावे लिहायचो आणि मंडळाच्या दिशेने बाण दाखवायचो. हेच आमचं त्या काळातील प्रमोशन होतं. त्याकाळी भंडारा वगैरे प्रचलित नव्हता. मात्र प्रसादासाठी आम्ही फार उत्साही असायचो. बालपणीच्या या श्री गणरायाच्या स्थापनेच्या आठवणी आजही आठवतात. त्यामुळे त्या कायमस्वरणात राहणाऱ्या आहेत.

यावेळी डॉ. उमेश वाणी यांनी देखील आपल्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, कोरोना काळातील घरच्या घरी मातीच्या गणरायाची मूर्ती करून आम्ही त्या कठीण काळात साजरा केलेला घरातल्या घरातील गणेशोत्सव हा कायम स्मरणात राहणारा आहे. यासाठी कुटुंबाने विशेष मेहनत घेतली होती. मुलांनी आरास तयार करण्यासाठी घरातील वस्तूंचा वापर केला. त्यानंतर हाताने छान श्री गणरायाची मूर्ती तयार केली. तिला रंगरंगोटी करून सजवलं. मुळात विस्तारित स्वरूपात गणेशोत्सव साजरा करण्यावर बंधन आलं होतं. त्यामुळे घरातल्या घरात श्री गणरायाची स्थापना करून आम्ही साजरा केलेला गणेशोत्सव आम्हा सर्वांसाठीच विशेषतः माझ्यासाठी कायम लक्षात राहणारा ठरला. त्या कठीण काळात आम्ही श्री गणरायाला हे संकट दूर जाण्यासाठी साकडे देखील घातलं होतं. आणि श्री गणरायाने ही मागणी मान्य करून लवकरात लवकर कोरोना महामारी पासून सर्वांना मुक्त देखील केलं होतं. त्या कठीण काळात आम्ही साजरा केलेला हा गणेशोत्सव अविस्मरणीय आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.