गिरीश महाजनांची नाकाबंदी? आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

0

जळगाव : भाजपचे सकंटमोचक अशी ओळख असलेल्या गिरीश महाजनांचे उजवे हात समजले जाणारे जळगाव येथील सुनील झंवर या व्यावसायिकावर बीएचआर सोसायटी प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने छापेमारी केल्याचा योगायोग जुळून आला आहे. केंद्रातील भाजप सरकारने शिवसेना आमदार प्रताप नाईक यांच्यावर ईडीची कारवाई करून शिवसेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला असतानाच, या कारवाईचा योगायोग जुळून आला आहे.

माजी मंत्री एकनाथराव खडसेंच्या राष्ट्रवादीतल्या प्रवेशाला महिनाही होत नाही तोच महाजनांच्या खंद्या समर्थकांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागल्याने सरकारकडून महाजनांची नाकाबंदी सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

बेनामी मालमत्तेच्या ठेवींप्रकरणी चौकशीच्या रडारवर असलेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑप. सोसायटी अर्थात ‘बीएचआर’शी निगडित जळगावात पाच ठिकाणी पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या १३५ अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पथकाने छापे टाकले. माजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत सावलीप्रमाणे वावरणारे सुनील झंवर यांच्या विविध फार्मवरदेखील छापे टाकल्याने ही कारवाई राजकीय वर्तुळात महत्त्वाची मानली जात आहे.

दीड हजार कोटींच्या आर्थिक घोटाळ्यात ठेवीदारांची रक्कम परत देण्यासाठी जितेंद्र कंडारे यांची अवसायक म्हणून नेमणूक करण्यात आली. मात्र, कंडारे यांनी राजकीय पक्षाच्या नेत्यांना हाताशी धरून कर्जदारांच्या जमिनी, तसेच स्थावर मालमत्ता कवडीमोल भावात विकल्याचा आरोप आहे. ठेवींच्या रकमा मॅचिंग करण्यासह तडजोडीच्या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार अवसायकांमार्फत करण्यात आले. मात्र, ठराविक व्यक्तींनी या जमिनी, तसेच स्थावर मालमत्ता मातीमोल भावात खरेदी केल्या. यात झंवर यांचे नाव अग्रस्थानी आहे. झंवर आणि गिरीश महाजन यांचे सौहार्द संबंध सर्वश्रुत आहेत. महाजन यांच्या आरोग्य शिबिरांसह अन्य कार्यक्रमांना झंवर यांच्या संस्थेचेच ‘फंडिंग’ असते. त्यामुळे झंवर यांच्यावर झालेली कारवाई ही अप्रत्यक्ष महाजन यांच्यावरच निशाणा साधण्याचा प्रकार समजला जात आहे.

‘तुमची ईडी तर आमची सीडी’ असा इशाराच खडसेंनी भाजप नेत्यांना पक्ष सोडताना दिला होता. त्यामुळे या सगळ्या कारवाईमागे खडसे असल्याची चर्चा असून, राज्य सरकारला भ्रष्टाचाराची कागदपत्रे पुरवून फडणवीस आणि महाजन यांना कोंडीत पकडत असल्याची चर्चा आता जळगावमध्ये सुरू झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.