सरस्वतीच्या मंदिरात वर्चस्वासाठी असाही सारीपाट

0

(चांगभल)

धों.ज.गुरव
मो.नं.9527003891

जळगाव जिल्हयात सध्या पवित्र शिक्षण क्षेत्राला जणू गालबोट लागण्याच्या घटना घडत आहेत. 100 वर्षापूर्वी धर्मभूषण रावसाहेब लाठी यांनी स्थापन केलेल्या ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेत संस्थाचालक आणि शिक्षक यांच्यात गेल्या 4 वर्षापासून वाद चालू आहे. 15 जून रेाजी ऐन शाळा सुरु होण्याच्या पहिल्या दिवशी आर.आर. शाळेच्या गेटवरच गावगुंडांनी मुख्याध्यापकासह सर्व शिक्षकांना धक्काबुकी करुन शाळेत जाण्यास मजाव केला. प्रकरण पोलिसात गेले. गुन्हा दाखल होऊन चौकशी सुरु आहे. काल तर कहरच झाला. 100 वर्षाची ऐतिासिक परंपरा असलेल्या मराठा विद्या प्रसारक संस्था जळगावच्या नूतन मराठा महाविद्यालयात संस्था चालकांच्या दोन गटात दंगल झाली. दोन्ही गटाकडून तुफान दगडफेक करण्यात आली. यात तीन जण जखमी झाले. पोलिसांच्या सतर्कतेने एकाचा जीव वाचला अन्यथा जागेवरच त्याचा मुडदा पडला असता. दोन्ही गटांच्या लोकांना पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. एकूण 33 जणांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यात दोन्ही गटाच्या लोकांचा समावेश आहे. पोलिसांच्या हस्तक्षेपाने प्रकरण नियंत्रणात आले.
मराठा विद्याप्रसारक मंडळावर आमचाच ताबा असा दावा करणार्याा नरेंद्र पाटील आणि भोईटे गटात जुना वाद आहे. गेली अनेक वर्षे संस्था भोईटे गटाच्या ताब्यात होती. 2015 मध्ये संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक झाली. त्यात नरेंद्र पाटील गटाचे सर्व संचालक बहुमताने निवडून आले. त्यानंतर नरेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळ अस्तित्वात आले. उपाध्यक्षपदी प्रा. डी.डी. बच्छाव तर सेक्रेटरीपदी नरेंद्र पाटील यांचे लहान बंधू अ‍ॅणड. विजय पाटील यांची निवड झाली. नव्या संचालकांनी संस्थेची सूत्रे घेऊन कामकाज सुरु केले. दरम्यान भोईटे गटानी कोर्टातून नरेंद्र पाटलाच्या संचालक मंडळाला स्थगिती आणली. कारण मराठा विद्याप्रसारक शिक्षण संस्था 100 वर्षापूर्वी दोन कायद्यांतर्गत रजिष्टर असून त्यापैकी एक सहकारी कायद्यांतर्गत तर दुसरी धर्मदाय आयुक्ता तर्फे नोंदणी झालेली आहे. 2015 साली नगरसेवक नरेंद्र पाटील यांचे नेतृत्वात जे संचालक मंडळ निवडून आले ते सहकारी कायद्यातंर्गत होय. यांचे विरुध्द याच कायद्यातंर्गत भोईटे गटाने निवडणूक लढविली अन् ते त्यात पराभूत झाले. तथापि भोईटे गटाला एनकेन प्रकारे मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्था स्वत:च्य ताब्यात हवी होती. म्हणून धर्मादाय आयुक्त नोंदणी कायद्यांतर्गत आमचे यापूर्वी संचालक मंडळ अस्तित्वात होते. त्यामुळे आमचेच संचालक मंडळ वैध असून नरेंद्र पाटलांचे संचालक मंडळ बेकायदा असल्याचा दावा करुन मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेत दोन्ही संचालक मंडळाचा हस्तक्षेप सुरु झाला. शिक्षण संस्थेच्या ताब्यावरुन नरेंद्र पाटील आणि भोईटे गट आमने सामने आले. नरेंद्र पाटील गटाकडे संस्थेचा ताबा असतांना संचालकांच्या अंतर्गत कारभाराला कंटाळून भोईटे गटाविरुध्द अनेक वर्षापासून नरेंद्र पाटलांसोबत लढा देणारे संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. डी.डी. बच्छाव तसेच बी.बी. आबा पाटील आणि डॉ. सुरेश पाटील यांनी राजीनामा देऊन बाहेर पडले. ज्या उद्देशासाठी आपण भोईटे गटाशी लढा देऊन मविप्र संस्था ताब्यात घेतली. परंतु त्या उद्देशाला आपल्या कडूनही छेद जातोय असे प्रा. डी.डी. बच्छाव आणि इतर राजीनामा देणार्याा संचालकांनी दावा करुन ते संचालक पदाचा राजीनामा देऊन बाहेर पडले. प्रा. डी.डी. बच्छाव आणि इतर दोघांच्या राजीनाम्यानंतर तरी नरेंद्र पाटलांनी त्याची दखल घ्यायला हवी होती ती त्यांनी घेतली नाही. सत्ता हाती मिळाली कि माणूस धुंद होतो. तशातला हा प्रकार होय. त्यामुळे नरेंद्र पाटलांची जी प्रतिमा होती त्याला इथे छेद गेला. नरेंद्र पाटलांचे बंधू मविप्रचे सर्वेसर्वा समजनारे अ‍ॅयड. विजय पाटलांमुळे या संस्थेची प्रतिमा डागाळली. संस्थे विषयी समाजात असंतोष सुरु झाला त्याचा परिणाम भोईटे गटाला फावले अन् तिचे रुपांतर कालच्या दंगलीत झाले असे म्हटले तर त्यात वावगे होणार नाही.
महत प्रयत्नाने बहुजन समाजाच्या मराठा विद्याप्रसारक शिक्षण संस्थेवरील भोईटे गटांचा ताबा निवडणूक मार्गाने नरेंद्र पाटील गटाने मिळविला होता. परंतु नरेंद्र पाटील यांचे सेक्रेटरी असलेले बंधू अ‍ॅजड. विजय पाटील एवढयावरच न थांबता त्यांना आमदारकीचे स्वप्न पडू लागले. जळगाव जिल्हा स्थानिक स्वराय संस्थेच्या वर्षभरापूर्वी झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत अ‍ॅ्ड.विजय पाटील यांनी विद्यमान आमदार श्री चंदूभाई पटेल यांचे विरोधात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडून येणार नाही याची 100 टक्के खात्री असतांना सुद्धा हेकेखोरपणे अर्ज दाखल केला. निवडणूक बिनविरोध होऊ द्यायची नाही हा त्यांचा हेतु सफल झाला. परंतु त्यामुळे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन दुखावले. निवडणूक बिनविरोध झाली असती तर गिरीश महाजनांची प्रतिमा पक्षात वाढली असती अन् त्यांचा निवडणूक खर्चही वाचला असता. गिरीश महाजनाच्या विरोधात पंगा घेणे अ‍ॅढड. विजय पाटील यांना महागात पडले. त्याचा परिणाम भोईटे गटाला बळ मिळाले. त्यांनी धर्मादाय आयुक्त नोंदणी कायद्यांतर्गत आमचेच संचालक मंडळ वैध असा दावा करुन स्थगिती आणली आणि 160 दिवस कोणत्याच संचालक मंडळाकडे संस्थेची सूत्रे नव्हती. परवा तहसीलदार यांच्या निकालाचा चुकीचा अर्थ लाऊन मविप्रचा ताबा घेतला खरा पण त्याचे पर्यावसान दंगलीत झाले. आता त्याची किल्ली तहसीलदाराच्या हातात आहे. त्यामुळे संस्थेवर प्रशासक नेमले जाण्याची दाट शक्यता आहे. कारण कॉलेज सुरु झाले आहे. संस्था चालकांच्या दंगलीचा विद्यार्थ्यांवर वाईट परिणाम होणार नाही यासाठी प्रशासकच योग्य राहील.

Leave A Reply

Your email address will not be published.