उदय वाघांवरील आरोपाने भाजपच्या शतप्रतिशतला सुरंग?

0

जळगाव जिल्हातील अवैध धंद्यांना भाजप जिल्हाध्यक्षाचे संरक्षण असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली. त्यातच ड्रग्सचा व्यापार करणार्‍या अमळनेर येथील व्यापार्‍याकडून 10 लाख रुपये घेतल्याचा व्हिडियो वायरल झाल्याने त्यात भर पडली. सदर ड्रग्स व्यापार्‍यांवर पोलिसानी धाड टाकून 116 किलो गांजा जप्त करून त्याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्यातून व्यापार्‍याचे नाव वगळण्यासाठी उदय वाघ यांनी 10 लाख रुपये
घेतले असले तरी त्याचे नाव गुन्ह्यातून वगळले गेले नसल्याने त्या व्यापार्‍यांनी वाघ याना दिलेले पैसे परत मागितले. त्यावेळी 5 लाख परत दिले. आणि 5 लाख रुपये त्यासाठी खर्च झाल्याचे सांगितल्याचा संवाद संवाद व्हायरल झालेल्या व्हिडीओत प्रसिद्ध झाला. उदय वाघ यांच्यावरील या
आरोपाचे संदर्भात जिल्हाभरात टीका टिपणी सुरु झाली. माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या पदाचा तातडीने राजीनामा घ्यावा अशी मागणी केली. कारण उदय वाघांवरील झालेल्या आरोपाबाबत पुरावे असल्याने नैतिकतेची जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा दिला पहिजे. कारण साधे आरोप असताना नाथाभाऊंनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. जळगाव जिल्ह्यात आगामी निवडणुकात शतप्रतिशत भाजपच निवडून येईल अशी घोषणा भाजप तर्फे करण्यात आली असली तरी हि घोषणा आता अमलात येयीलच याची शक्यता नाही. कारण जळगाव जिल्ह्यातील भाजपमध्ये एकनाथराव खडसे आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन असे दोन गट आहेत. या दोन्ही नेत्यामध्ये विळ्याभोपळ्याचे नाते आहे.
जिल्हा भाजपचे अध्यक्ष उदय वाघ यांचेवर आरोप होताच अमळनेर तालुका भाजपमधील गटबाजी उफाळून आली. एक गट म्हणतो उदय वाघ यांच्यावरील आरोपामुळे भाजपची प्रतिमा मलीन होते त्यासाठी त्यांची जिल्हाअध्यक्षपदावरून हकालपट्टी करावी. भाजप प्रदेश अध्यक्षाने त्यांचा राजीनामा घ्यावा असे निवेदन जाहीर केले. या निवेदनावर माजी आमदार डॉ. बी.एस.पाटील, शामदास लुल्ला. लालचंद सैनानी,हरचंद लांडगे, सुभाष चौधरी, कैलास भावसार, डॉ. संजय शाह, दीपक भोई, कमल कोचर, भरतसिंघ पाटील, प्रीतमपालसिंघ बग्गा, बापू हिंदुजा, जुलाल पाटील, जाकीर शेख यांच्या सह्या आहेत. त्यामुळे एक मोठा गट उदय वाघांच्या
विरोधात आहे हे स्पष्ट होते. दुसरा गट उदय वाघांच्या पाठीशी असून त्या गटाचे म्हणणे आहे कि, उदय वाघांवर द्वेषबुद्धीने आरोप केलेले आहेत. भाजप कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी
आहेत. चोपडा येथील भाजपच्या दोन तालुका पदाधिकार्‍यांची हकालपट्टी करण्यात आली. पक्षाच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेतला असेल हे समजू शकतो. तथापि या दोन्ही पदाधिकार्यांनी हकालपट्टीच्या संदर्भात जो खुलासा केलाय तो धक्कादायक आहे. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची प्रकृती ठीक नसल्याने आम्ही त्यांना भेटायला गेलो महणून हि कारवाई करण्यात आली. या संदर्भात भाजप पक्षश्रेष्टी जो निर्णय घ्यायचा तो घेतील परंतु भाजपच्या एकसंघपणाला छेद जातोय आणि भाजपतील गटबाजी वाढते आहे एवढे मात्र निश्‍चित.
सत्ताधारी भाजप पक्षाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांचेवरील आरोपाची चौकशी होऊन ते सिद्ध होतील अथवा होणार नाहीत परंतु या घटनेमुळे भाजप कार्यकर्त्यात संभ्रम निर्माण झाला आहे. लोक सभेच्या निवडणुका तोंडावर
आहेत त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका होतील त्या साठी जिल्ह्यातील भाजपची प्रतिमा मलीन होणार नाही याची दक्षता पक्षश्रेष्टी कडून घेणे गरजेचे आहे पुणे येथील
भोसरी एमआयडीसितील जमीन खरेदी प्रकरणी नाथाभाऊना राजीनामा द्यावा लागला त्यांचे मंत्रिपद घेले अन जळगाव जिल्ह्यातील विकास कामे रेंगाळली. जिल्ह्यात दोन क्याबिनेट आणि एक राज्यमंत्री असतांना विकास कामे रखडली
आहेत. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी शासनातर्फे जी विकास कामे झाली त्यात कोणतीही भर भाजप शासनात पडली नाही. महामार्ग चौपदरीकरण रेंगाळले सहा वर्षानंतर आता कुठे चौपदरीकरणाच्या कामाला गती आली आहे. जळगाव शहरातील समांतर रस्त्यांचा प्रश्‍न रेंगाळून पडला आहे. पाडळसरे धरणाचे काम निधीअभावी बंद आहे. शेळगाव बॅरेजची एक वीटहि चढली नाही गिरनेतील बलून बंधार्‍याची घोषणा हवेतच विरली. हतनूरचा गाळ वाढतच चालला आहे. जळगाव शहराचा विकास निधीअभावी रखळला आहे. कृषी महाविद्यालयाची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली पण ती घोषणाच राहिली या सर्व विकास कामांच्या खोळंब्याला भाजपातील
गटबाजी कारणीभूत आहे. आता उदय वाघांवरील आरोपांमुळे गटबाजी वाढल्याशिवाय राहणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.