मुख्यमंत्री एकनाथराव खडसेंना घाबरतात!

0

अंजली दमानिया यांचा आरोप : गिरीश महाजन, सुरेशदादाही भ्रष्टाचारी
जळगाव, दि. 20 –
पुण्यातील भोसरी जमीन घोटाळ्यात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना मिळालेली क्लीनीचीट संशयास्पद असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खडसे यांना घाबरत असल्याने त्यांनीच ही क्लीनचीट दिल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. मी कुण्याही मंत्र्यांचा प्यादा नसून मंत्री गिरीश महाजन व सुरेशदादा जैनही भ्रष्टाचारी असल्याचे त्या म्हणाल्या. जळगावात आयोजित पत्रपरिषदेत त्या बोलत होत्या.
अंजली दमानिया म्हणाल्या की, माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी चोपडा अर्बन र्का ऑप बँकेच्या डीडी प्रकरणी पोलीस, न्यायालयाची दिशाभूल केली आहे. बँकेचे दोन डीडी त्यांच्या पोस्टपेटीत कुणीतरी टाकले असून हे एक षडयंत्र असल्याचा ते कांगावा करीत आहेत. या सर्व प्रकरणात त्यांना महाराष्ट्र शासनाचा लोगो असलेल्या लेटरपॅडचा गैरवापर केला असून प्रशासन व न्यायपालिकेची दिशाभूल केली असून त्यांना त्वरीत निलंबित करण्याची मागणी सभापतींकडे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आजपर्यंत खडसेंविरुद्ध आवाज उठविणार्‍यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला आहे, मात्र मी कुणालाही घाबरणार नाही. पोलीस प्रशासनावर ते दडपण टाकून मला व माझ्या कार्यकर्त्यांना सातत्याने त्रास देण्याचे काम करीत आहेत. सर्वोच्च न्यायालयात प्रकरण असताना देखील त्यांनी राज्यातील 26 पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पद, पैसा याच्या बळावर ते प्रत्येकाचा छळवाद करीत असून हे त्यांच्या प्रतिष्ठेला शोभत नाही. खडसे हे शेतकरी असल्याचे सातत्याने सांगत असतात मग त्यांच्याकडे कोट्यवधींची मालमत्ता कशी आली. नातेवाईकांच्या नावे जमीनी खरेदी करुन त्यांनी शासनाची फसवणूक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करावी, मी केवळ प्यादा असून माझ्या मागे मंत्र्यांचा हात असल्याचा आरोप ते करीत असतात मात्र मी कुणाचीही प्यादा नाही. मंत्री गिरीश महाजन व सुरेशदादा जैन हेही भ्रष्टाचारी आहेत.
दहा भुजबळ-खडसे आले तरी चालतील
माजी मंत्री छगन भुजबळ व एकनाथराव खडसे एकत्र येत असतील तर ते केवळ फायद्यासाठी येत आहेत. मी भुजबळांविरुद्ध देखील लढा दिला आता खडसेंच्या विरोधात लढत आहे दहा भुजबळ-खडसे आले तरी माझे काहीही करु शकत नाही. भ्रष्टाचार्‍यांची मोटच खडसे बांधत असल्याचा आरोप त्यांनी केला.
खडसे, महाजन, जैन एकाच माळेचे मनी
जलसंपदामंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री एकनाथराव खडसे, सुरेशदादा जैन हे भ्रष्टाचारी आहेत. त्यांच्याकडून विकास होणे शक्यच नाही. ते सर्वांची दिशाभूल करण्यात पटाईत असून ते एकाच माळेचे मनी असून त्यांच्या विरुद्धचा लढा कायम राहिल असेही दमानिया यांनी सांगितले.
खटोडांना जमिनीचा प्रसाद
बांधकाम व्यावसायिक खटोड बंधूू यांना शहरातील एस.टी. महामंडळाची मोकळी जागा दिल्यानंतर त्यांनी राजकीय पदाधिकार्‍यांना वाटप केली. यात गिरीश महाजन, साधना महाजन, अ‍ॅड. रोहिणी खडसे-खेवलकर यांचा समावेश असून याचीही चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली.
हिंमत असेल तर अटक करा!
मी खडसेंच्या विरोधात पुराव्यानिशी तक्रारी दिल्या आहेत. उलटपक्षी खडसे हे पोलिसांची दिशाभूल करीत मला अटक करण्याची मागणी करीत आहेत, पोलिसांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी मला अटक करुन दाखवावी असे आव्हानही त्यांनी दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.