40 हजाराची लाच भोवली; पोलीस अधिकाऱ्यासह दोघे एसीबीच्या जाळ्यात

0

कोल्हापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  

अवैध गुटखाप्रकरणी पोलिसांच्या अटकेत असलेल्या संशयित आरोपीच्या जामिनाकरिता व गुन्ह्यातील तपास कामात मदत करण्यासाठी मध्यस्थांमार्फत लाच स्वीकारताना कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र शंकर उगलमुगले यांना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी मध्यस्थी आप्पासाहेब सुभाष मगदूम यालाही अटक करत त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शिरोळ तालुक्‍यात एकच खळबळ उडाली.

याबाबत अवैध गुटखा व्यावसायिकांच्या भावाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. कुरुंदवाड हेरवाड रोडवर कुरुंदवाड पोलिसांनी गौसमहम्मद अन्वर गवंडी याला गुटख्याची अवैध वाहतूक करताना सापळा रचून पकडले. यानंतर बीट अंमलदार म्हणून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उगलमुगले यांच्याकडे तपासाची सूत्रे देण्यात आली होती.

गुटख्यातील आरोपीला तपासात व जामिनासाठी मदत करतो म्हणून मध्यस्थ आप्पासाहेब मगदूम यांच्या करवी 50 हजार लाचेची मागणी करण्यात आली होती. तडजोडी अंती 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताना मगदूम व उगलमुगले यांना रंगेहाथ पकडून ताब्यात घेण्यात आले. शिरोळ येथील विश्रामगृहात संशयित आरोपींचे जबाब नोंदवून रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत, शरद पोरे, सुनिल घोसाळकर, नवनाथ कदम, मयूर देसाई या पथकाने केली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.