धक्कादायक.. कोंबडीची शिकार केल्याने मांजरीला गोळी घालून मारले

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. कोंबडीचे पिलू खाणाऱ्या शेजाऱ्याच्या मांजरीलाच छऱ्याच्या बंदुकीने मारून टाकल्याचा शहरातील घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच  व्हायरल होतो आहे. विशेष म्हणजे याबद्दल जाब विचारल्यावर दुसऱ्या मांजरीलाही मारण्याची धमकी या विक्षिप्त माथेफिरूंने दिल्यामुळे पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे .

अनेक मुक्या प्राण्यांसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणारे अनेक प्राणीप्रेमी काम करताना दिसतात. मात्र एका  माथेफिरूने चक्क एका मांजरीला बंदुकीची गोळी घालून ठार केल्याचा हा दुर्दैवी प्रकार गुरुवारी सकाळी घडला.

जळगाव शहरातील रामानंद नगर बस स्टॉपजवळ पुष्पराज बाणाईत हे परिवारासह राहतात. परिसरातील भटक्या मांजरीचे ते संगोपन करतात. बाणाईत यांच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने कोंबड्या पाळल्या असून गुरुवारी मांजरीने कोंबडीच्या पिल्लाची शिकार केली. आपल्या कोंबडीचे पिल्लू मारल्याचा राग आल्याने त्या माथेफिरूने छऱ्याच्या बंदुकीतून कपाळाच्या मधोमध गोळी मारल्याने मांजर तडफडून मेली. हेमराज सोनावणे असे या विक्षिप्त तरुणाचे नाव आहे.

तसेच याबाबत जाब विचारला असता ‘मी असाच आहे, मी असाच आहे’ असे बेजाबदारपणाचे उत्तर त्याने दिले. ‘त्या काळ्या मांजरीचा देखील मी जीव घेईल’ अशी धमकी त्याने दिली. शहरातील नागरिकांकडून निर्दयीपणे मांजरीचा जीव घेणाऱ्या व्यक्तीविरुद्ध संतप्त प्रतिक्रिया उमटत असून कठोर कारवाईची मागणी होत आहे. आधी रामानंदनगर पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्याला तालुका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे . घटनास्थळ तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याचे सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.