८०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथमेश देवरे याला सुवर्णपदक

0

जळगाव ;- चेन्नई येथे झालेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ मैदानी स्पर्धेत ८०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या प्रथमेश देवरे या विद्यार्थ्याने सुवर्णपदक प्राप्त केले.

मैदानी स्पर्धेतील धावण्याच्या स्पर्धेत विद्यापीठाला प्रथमच या गटात सुवर्णपदक प्राप्त झाले आहे. चेन्नईच्या तामिळनाडू फिजिकल एज्युकेशन ॲण्ड स्पोर्टस् विद्यापीठात अखिल भारतीय आंतर विद्यापीठ मैदानी स्पर्धा झाली. या स्पर्धेत प्रथमेश देवरे या विद्यार्थ्याने ८०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम येत सुवर्णपदक पटकावले. त्याने १ मिनिट ५० सेकंद ७२ मिली सेकंदात हे अंतर पार केले. त्याआधी नागपूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य क्रीडा महोत्सव आंतर विद्यापीठ स्पर्धेत देखील त्याने ८०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत १ मिनिट ५२ सेकंदात हे अंतर पार करून सुवर्णपदक पटकावले होते. त्या आधारावर तो भुवनेश्वर येथे झालेल्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत सहभागी झाला होता. तेथील स्पर्धेत उत्तम कामगिरी करून तो अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी पात्र ठरला होता. प्रथमेश देवरे हा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सोनगीर या महाविद्यालयात बी.ए. तृतीय वर्षात शिकत आहे.

प्रथमेश देवरे याचा कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील, सोनगीर महाविद्यालयाचे अध्यक्ष अमृतराव कासार, उपाध्यक्ष दंगल धनगर, संचालक मुरलीधर चौधरी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. बी. पाटील, शारीरिक शिक्षण संचालक नरेंद्र पाटील, डॉ. व्ही. डी. पाटील, डॉ. आर. के. जाधव उपस्थित होते. नियमित सरावाबाबत अडचण आल्यास विद्यापीठाच्यावतीने सहकार्य केले जाईल असे यावेळी कुलगुरूंनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.