३१ मेनंतर लॉकडाऊन संपणार का?

0

मुंबई ; राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेतील रुग्णांची संख्या आता काही दिवसांपासून कमी होत आहे. एप्रिल महिन्यात रोज ७० हजारांहून अधिक रुग्ण आढळून येत होते. आता हाच आकडा ३० हजारांच्या खाली आला आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणेवरील ताण काहीसा कमी झाला आहे. त्यामुळे ३१ मेनंतर लॉकडाऊन संपणार का, असा प्रश्न पडला  असताना याचे उत्तर खुद्द आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी  दिले आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक या मोठ्या शहरांमधील करोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांत घटली आहे.  त्यामुळे या शहरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र ग्रामीण भागांत करोना आणखीनच सक्रिय आहेत. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढला आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना आरोग्यमंत्र्यांनी महत्त्वपूर्ण संकेत दिले. ‘१ जूनपासून निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल केले जातील. कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असलेल्या जिल्ह्यांमधील निर्बंध हळूहळू मागे घेतले जातील,’ अशी माहिती टोपे  यांनी दिली असल्याचे एका वृत्त वाहिनीने दिले आहे. ‘सध्या राज्यात कठोर निर्बंध लागू आहेत. दुकाने केवळ सकाळी ७ ते ११ या वेळेतच सुरू ठेवण्याची मुभा आहे. याचा परिणाम अनेक ठिकाणी दिसून आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला आहे. मुंबईसह एमएमआर रिजनमधील स्थिती नियंत्रणात आहे. नाशिक, नागपूरमधील परिस्थितीदेखील चिंताजनक नाही. त्यामुळे या भागातील निर्बंध १ जूनपासून हळूहळू शिथिल केले जातील. निर्बंध एकदम मागे घेण्याऐवजी टप्प्याटप्यानं मागे घेतले जातील. कोरोना रुग्णसंख्या कमी झालेल्या जिल्ह्यांसाठी या प्रकारचे निर्णय घेतले जातील,’ अशी माहिती टोपेंनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.