सौ. र.ना.देशमुख महाविद्यालयात आर्थिक विचार मंचाचे उद्घाटन

0

भडगाव प्रतिनिधी-

भडगाव येथील सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी ‘आर्थिक विचार मंच’ स्थापन करण्यात आला. या मंचाचे उद्घाटन नुकतेच पार पडले. आप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरूड महाविद्यालय, शेंदुर्णी येथील प्रा. अमर जावळे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी ‘राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील रोजगाराच्या संधी’ या विषयावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, वर्तमान काळातील अर्थकारण सर्वात महत्त्वपूर्ण असून सर्व व्यवस्था पैशांभोवती फिरते. त्यामुळे समकालीन अर्थशास्त्राचा अभ्यास करणे फार आवश्यक आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी वेबलर, अच्युत गोडबोले अशा वर्तमान काळातील अर्थकारणावर लिहिणार्या लेखकांची पुस्तके वाचली पाहिजेत. त्यातून अर्थशास्त्राविषयी एक नवीन दृष्टी विकसित होण्यास मदत होते. प्राचीन काळापासून अर्थशास्त्र हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग राहिला आहे. काळाच्या ओघात अर्थशास्त्राचे रूप सतत बदलत गेले. विद्यार्थ्यांनी आधुनिक आर्थिक विचारांशी स्वतःला जोडून घेतले पाहिजे. त्यांनी अर्थशास्त्रातील नियम स्वतःच्या जगण्यात उतरवावे व स्वावलंबी व्हावे.
आर्थिक विचार मंचाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यात अध्यक्षपदी कु.भाविका सुपडू पाटील (तृतीय वर्ष कला), उपाध्यक्षपदी कु.स्नेहल उखा पवार (तृतीय वर्ष बी.ए.) व सचिवपदी कु.जयश्री अशोक चव्हाण (द्वितीय वर्ष कला) यांची निवड करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा. एस.आर.पाटील होते. अर्थशास्त्र विभागप्रमुख डाॅ. बी.एस.भालेराव यांनी सूत्रसंचालन व प्रास्ताविक केले तर आभारप्रदर्शन प्रा. एस.आर.कोळी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. जे.जे.देवरे व अर्थशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.