सोने खरेदीची सुवर्णसंधी; बाजारभावापेक्षा ३,३३० रुपयांनी स्वस्त!

0

नवी दिल्ली :  सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या भावात सातत्याने वाढ होत आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकार तुम्हाला स्वस्त सोनं खरेदी करण्याची संधी देत ​​आहे. बाजारभावापेक्षा कमी भावाने सोने खरेदी करण्याची संधी केंद्र सरकारने उपलब्ध करून दिली आहे.

सार्वभौम सोने खरेदी योजनेअंतर्गत येत्या १३ नोव्हेंबरपर्यंत प्रति दहा ग्रॅमसाठी ५१,७७० रुपयांनी सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी चालून आली आहे. हा दर बाजारभावापेक्षा ३,३३० रुपयांनी कमी आहे. चालू आर्थिक वर्षातील ही आठवी मालिका आहे. या योजनेसाठी जे गुंतवणूकदार ऑनलाइन अर्ज करतील आणि डिजिटल पेमेंट करतील त्यांना प्रति ग्रॅम ५० रुपयांची सवलत मिळणार आहे.

इच्छुक गुंतवणूकदारांना स्मॉल फायनान्स बँका व पेमेंट बँका वगळता अन्य सर्व बँकांतून हे रोखे खरेदी करता येतील. तसेच स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि अधिकृत पोस्ट कार्यालयांतूनही हे रोखे विक्रीसाठी उपलब्ध असतील. याखेरीज राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) आणि मुंबई शेअर बाजार (बीएसई) येथूनही सुवर्णरोख्यांची खरेदी करता येईल. सुवर्णरोख्यांचा कालावधी आठ वर्षांचा असून, कालावधी पूर्ण होण्याआधी या रोख्यांची विक्री करायची झाल्यास ती कालावधीच्या पाचव्या वर्षापासून करता येईल. किमान गुंतवणूक एक ग्रॅम सोन्याच्या युनिटमध्ये, तर कमाल गुंतवणूक चार किलो सोन्याच्या युनिटमध्ये करता येईल. सरकार या रोख्यांवर २.५ टक्के व्याज देणार आहे. हे सुवर्णरोखे शेअर बाजारात सूचिबद्ध असणार आहेत.

२.५० टक्के व्याज

सार्वभौम सुवर्णरोखे योजनेच्या इश्यू प्राइसवर दर वर्षी २.५० टक्के दराने निश्चित व्याज मिळते. व्याजाची रक्कम दर सहा महिन्यांनी गुंतवणूकदाराच्या खात्यात जमा केली जाते. सोनेखरेदी आणि गोल्ड ईटीएफमध्ये अशाप्रकारचे फायदे मिळत नाहीत. एनएसईच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार या योजनेतील गुंतवणुकीवर ८ वर्षांच्या मुदतपूर्तीनंतर मिळणाऱ्या लाभावरही कोणताही कर आकारला जात नाही. दर सहा महिन्यांनी मिळणाऱ्या व्याजावरही टीडीएस आकारला जात नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.