सीबीएसई दहावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ; ‘या’ विषयाच्या अभ्यासक्रमात कपात

0

मुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई बोर्डाने (CBSE) इयत्ता दहावीच्या सामाजिक शास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील लाखो विद्यार्थ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. या विषयाची परीक्षा २७ मे २०२१ रोजी होणार आहे.

 

सोशल सायन्सेसच्या थिअरी विषयातून एकूण पाच धडे वगळण्यात आले आहेत. सुधारित अभ्यासक्रम सीबीएसई बोर्डाच्या संकेतस्थळावर लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल. याबाबत केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, करोना व्हायरस महामारीमुळे शाळांचे कामकाजाचे दिवस कमी झाले होते. बहुतांश विद्यार्थी ऑनलाइन माध्यमातून शिक्षण घेत आहेत. अशा परिस्थितीत अभ्यासक्रम कमी व्हावा याबाबत विद्यार्थी, पालक, शिक्षकांचेही एकमत होते.

 

यापूर्वी केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी सांगितले होते की कोविड-१९ विषाणू महामारीमुळे संपूर्ण देशात असामान्य परिस्थिती ओढवली आहे. त्यामुळे सीबीएसई बोर्डाला अभ्यासक्रम कपातीची शिफारस करण्यात आली आहे.

 

त्यानंतर सीबीएसई बोर्डाने अभ्यासक्रमात ३० टक्के कपात केली होती. केंद्रीय शिक्षणमंत्र्यानी देशभरातील शिक्षणतज्ज्ञांकडून अभ्यासक्रम कपातीविषयीच्या सूचनादेखील मागवल्या होत्या. शिक्षणमंत्र्यांच्या आवाहनानंतर १५० शिक्षणतज्ज्ञांनी त्यांच्या सूचना पाठवल्या होत्या.

 

सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा ४ मे २०२१ ते १० जून २०२१ या कालावधीत आयोजित करण्यात आल्या आहेत. परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच होणार आहेत. सुमारे ३० लाख विद्यार्थी या परीक्षा देतील.

Leave A Reply

Your email address will not be published.