वाळू माफीयाची दंबगिरी ; प्रांताधिकाऱ्यांच्या गाडीला धडक

0

यावल (प्रतिनीधी) :  वाळू माफियांचा पाठलाग करणाऱ्या फैजपूर विभागीय अधिकाऱ्यांच्या (प्रांताधिकाऱ्यांच्या) गाडीला बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने पळून जाण्याच्या प्रयत्नात जोरदार धडक दिल्याची खळबळजनक घटना काल रात्री उशिरा यावल तालुक्यातील न्हावी जवळ घडली. यावेळी विभागिय अधिकाऱ्यांचा जीपचा चालक जखमी झाला असून शासकीय गाडीचेही नुकसान झाले आहे. याप्रकरणी वाळू वाहतूक करणारा डंपर,त्यावरील चालक आणि सोबत असणारी कार ताब्यात घेण्यात आली असून फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती उपविभागीय महसूल अधिकारी कैलास कडलग यांनी भ्रमण ध्वनिवर एका प्रतिनिधीशी बोलतांना  दिली  दिली.

काल (ता २४) रात्री उशिरा अकराच्या सुमारास बेकायदेशीर वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी आपल्या शासकीय वाहनातून चालक उमेशसह या डंपरचा पाठलाग यावल- किनगांव दरम्यान केला. मात्र अंधाराचा फायदा घेत हा डंपर किनगाव भागात पळून जाण्यात यशस्वी झाला. तेथून परत येताना श्री कडलग यांना न्हावी गावाकडे एक वाळू वाहतूक करणारा डंपर जाताना दिसला. त्यांनी या डंपरचा पाठलाग करतात डंपर सुसाट वेगाने न्हावी गावातील अडचणीच्या अरुंद गल्लीत शिरला. तेथून पळून जाण्याच्या प्रयत्नात डंपर रिव्हर्स नेताना शासकीय गाडीला पुढून जोरात धक्का लागून गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांचे वाहन चालक उमेश यांनाही झालेल्या ओढाताणीत वाळूमाफियांनी धक्काबुक्की केली असून त्यांना मुका मार लागलेला आहे. याप्रकरणी या डंपरला संरक्षण देणाऱ्या १०१० क्रमांकाच्या पांढऱ्या कारसह  डंपरला ताब्यात घेण्यात आली आहे. सुसाट वेगाने डंपर चालवणाऱ्या अठरा एकोणीस वर्षाच्या युवकाला ही पोलिसांनी ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

विना क्रमांकाच्या या डंपर्समधून वाळू वाहतूक पोलिसांच्या आशीर्वादाने होत असल्याचे महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी धडक कारवाई करण्याची अपेक्षा महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.