सा. बां. विभागाच्या विरोधात उपोषणाचा तिसरा दिवस; अद्याप दखल नाही

0

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

शहराच्या मध्यभागी असलेल्या महामार्गाचे म्हणजेच बसस्टँड समोरील नवा रस्ता बनविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत मागील काही महिन्यांपासून हाती घेण्यात आले आहे. बस स्थानक समोरील मुख्य रस्ता गेल्या दोन महिन्यांपासून खोदून ठेवल्यामुळे शुक्रवार पासून सामाजीक कार्यकर्ते राजेंद्र वाघ व मित्र परिवार गेल्या तीन दिवसांपासून उपोषणास बसले असून अद्यापपावेतो संबंधित कार्यालयाकडून उपोषणस्थळी आले नाहीत. व उपोषणकर्त्यांची साधी दखलही घेतली गेलेली नाही. उपोषणाला तालुका अधिकृत पत्रकार संघ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय किसान मोर्चा व विविध सामाजिक संघटना व शहरातील जागृत नागरिकांचा पाठिंबा मोठ्या प्रमाणात मिळत आहे.

सविस्तर माहिती अशी, खोदून ठेवलेल्या रस्त्याच्या कामात दिरंगाई होताना दिसत असल्याने नागरिकांना सतत प्रचंड वाहतूकीच्या कोंडीला सामोरे जावे लागत असल्याने धरणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र वाघ हे दि.२६ नोव्हेंबर २०२१ पासून उपोषणास बसले आहे.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाला लागून असलेल्या महामार्गाच्या रस्त्याचे नव्याने काम सुरू असल्याने ऐन नवरात्री – दिवाळीच्या सणासुदीला खोदकाम करून ठेवले असून काम इतक्या संथ गतीने सुरू आहे की, त्याचा मनःस्ताप नागरिक व वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. आज रविवार रोजी बस स्थानक समोर खोदून ठेवलेल्या रस्त्यामुळे पष्टाणे येथील सरपंच देवराम भिल यांना समोरून येणाऱ्या वाहनाची धडक बसल्याने अपघात होवून त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभार व नियोजन शून्य कारभार त्यातच वाहतूक पोलीस यांनी देखील संबंधित ठिकाणी बघ्याची भूमिका घेतलेली असल्याने या खोदलेल्या ठिकाणी तासंतास वाहतुकीच्या कोंडीने शहरात येणाऱ्या व शहराबाहेर जाणाऱ्या वाहनचालकांसाठी, कामगार व नागरिकांसाठी रोजची डोकेदुखी ठरत आहे. खोदून ठेवलेल्या रस्त्याच्या समस्येचा सर्वात जास्त त्रास बैलगाडी, गुरेढोरे, दिव्यांग, कामासाठी येणाऱ्या महिला व कर्मचाऱ्यांना होताना दिसत असून या रहदारीमुळे येतांना – जातांना नागरिक घसरून पडण्यासह अपघाताचे प्रकार होत आहेत.

सर्व नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या रस्त्यांचे काम सा. विभागाला लवकर करायचे नव्हते तर, चांगला रस्ता उखडून ठेवला कशाला, याच कारणाने राजेंद्र वाघ व मित्र परिवार यांच्यासह इतर त्रस्त प्रवासी व नागरीकांनी याच कारणास्तव उपोषणाची भूमिका घ्यावी लागली. सा.बां. विभागाने प्रशस्त असलेला चांगला रस्ता उखडून ठेवला. त्यावेळी हे काम जलद गतीने होईल, अशी नागरिकांना अपेक्षा होती परंतु आजमितीस दोन महिने होत आले तरी, कामाला म्हणावी तशी गती नाही व त्यातच रस्ता खड्डेमय झाला असल्याने वाहनचालकांसह कामगार विशेष करून महिलांना त्याचा जास्त त्रास होत आहे. वाहनचालकांना वाहन काढता येत नाही तर गुरेढोरे, दिव्यांग, विकलांग, महिलावर्ग व जेष्ठ नागरिकांची काय अवस्था असेल याची कल्पना न केलेली बरी.

Leave A Reply

Your email address will not be published.