सर्वोच्च न्यायालयातील अव्यवस्थेवर चार न्यायाधीशांनी डागली तोफ

0

नवी दिल्ली-
सुप्रीम कोर्टातील प्रशासनाच्या कामकाजात गेल्या दोन महिन्यांपासून अनियमतता होती. आम्ही यासंदर्भात सरन्यायाधीशांनाही पत्र लिहीले होते. पण आता आमच्यासमोर नाईलाज आहे, असा गंभीर आरोप सुप्रीम कोर्टाच्या चार वरिष्ठ न्यायाधीशांनी शुक्रवारी केला आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन अशा स्वरुपाचे आरोप केले आहेत.
सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश चेलमेश्‍वर, रंजन गोगोई, मदन लोकूर, कुरियन जोसेफ यांनी शुक्रवारी दुपारी पत्रकार परिषद घेतली. न्या. चेलमेश्‍वर म्हणाले, ही एक असामान्य घटना आहे. सुप्रीम कोर्टाच्या प्रशासकीय कामकाजात अनियमितता आहे. न्यायव्यवस्थेच्या निष्ठेवरच प्रश्‍न उपस्थित होत आहेत. आम्ही या संदर्भात सरन्यायाधीशांना एक पत्र पाठवले, पण अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. दोन महिन्यांच्या घटनाक्रमानंतर आम्हाला माध्यमांसमोर येणे गरजेचे होते. आता जनतेनेच योग्य काय ते ठरवावे, असे त्यांनी सांगितले. न्यायव्यवस्था टिकली तरच लोकशाही टिकेल, असे त्यांनी आवर्जून नमूद केले. चेलमेश्‍वर हे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यानंतरचे सर्वात वरिष्ठ न्यायाधीश आहे. त्यांनीच पत्रकार परिषद घेऊन आरोप केल्याने देशभरात खळबळ उडाली. प्रशासनाच्या कामकाजात अनियमितता म्हणजे नेमके काय?, तुमची मागणी काय होती?, असे प्रश्‍न त्यांना विचारण्यात आले. मात्र त्यांनी याबाबत भाष्य करण्यास नकार दिला. आम्ही थोड्याच वेळात सरन्यायाधीशांना दिलेले पत्र सार्वजनिक करु, असे त्यांनी सांगितले. या पत्राची प्रत अद्याप मिळालेली नाही. न्यायाधीश लोया यांच्या मृत्यूप्रकरणाशी काही संबंध आहे का असा प्रश्‍न विचारला असता न्या. लोकूर यांनी त्यावर ङ्गहोफ असे उत्तर दिले. मात्र, त्यांनी देखील याबाबत सविस्तर भाष्य केलेले नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन महिन्यांपूर्वी या चार न्यायाधीशांनी सरन्यायाधीशांना पत्र लिहीले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.