सरपंच चषक पटकाविण्यासाठी खेळाडूंचा कसून सराव

0

भुसावळ दि. 28
तालुक्यातील साकेगाव येथे ग्रामपंचायत साकेगाव व जळगाव जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सरपंच चषक वर्ष-5 साठी 24 संघातील 264 खेळाडूंनी कसूर सराव सुरू केला असून चषक पटकाविण्यासाठी सर्व संघांमध्ये चुरस लागलेली आहे. जो जिंकेल त्या संघाचा वर्षभरासाठी ग्रामपंचायत मध्ये फोटो लावण्यात येतो. गावातील खेळाडूंना सुप्तगुणांना वाव मिळावा, प्रतिभा दाखवण्याची संधी मिळावी, गावाचा नाव जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्तरावर लौकिक व्हावा याकरिता ग्रामपंचायत व जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट संघटनेतर्फे सन 2015 पासून सरपंच चषकाचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेत फक्त गावातील स्थानिक संघास भाग घेता येतो, राष्ट्रीय महामार्गावर जिल्हा परिषदेच्या मैदानावर अत्यंत दिमाखात स्पर्धेचे आयोजन केले जाते जिंकणार्‍या संघास ग्रामपंचायत तर्फे रोख बक्षीस तसेच उपविजेत्या संघास जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट संघटनेतर्फे रोख बक्षीस देण्यात येतो तसेच जिंकणार्‍या संघाची फिरत्या चषकासह सवाद्य गावातून मिरवणूक काढण्यात येते वर्षभरासाठी फोटो ग्रामपंचायत कार्यालयात लावण्यात येतो. सरपंच चषकाला उत्सवाप्रमाणे गावात साजरा केला जातो यासाठी गावाबाहेर व्यवसाय व नोकरी निमित्त गेलेले डॉक्टर, इंजिनिअर, रेल्वे कर्मचारी, पोलिस विभागातील, इतर विभागातील सर्वच खेळाडू स्पर्धेत भाग घेण्यासाठी गावात येतात मानाची स्पर्धा आपला संघ जिंकावा यासाठी सर्वच संघांमध्ये चुरस निर्माण झाली असून यासाठी कसून सराव केला जात आहे यामुळे आरोग्याच्या दृष्टिकोनातून व्यायामही होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.