शिवाजी नगर उड्डाणपुल, सुरत गेट, असोदा गेट, ममुराबाद पुलाची आयुक्तांकडून पाहणी

0

जळगाव –
सध्या जळगावकरांना छळत असलेल्या शिवाजी नगर उड्डाणपुल, सुरत रेल्वे गेट, असोदा गेट ममुराबाद पुलाची आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांनी मंगळवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत शहर अभियंता सुनिल भोळे हे उपस्थित होते.
महानगरपालिकेचे नवीन आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांनी पद्भार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच मंगळवारी शिवाजी नगर उड्डाण पुलाची पाहणी केली. यावेळी डॉ. टेकाळे यांनी रेल्वे मार्फत करण्यात येणारे काम व महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे करण्यात येणार्‍या पुलाच्या बांधकामाची माहिती जाणून घेतली. शिवाजी नगर उड्डाण पुलाला पर्याय असलेला सुरत रेल्वे गेटची पाहणी केली. तसेच ममुराबाद पुलाच्या कामाचा आढावा त्यांनी घेतला. त्यानंतर असोदा रेल्वे गेटची पाहणी केली.
यासह नागरिकांना कोणते पर्यायी रस्ते उपलब्ध करुन देता येवू शकतात, याचीही माहिती त्यांनी घेतली.

डीआरएम यादव यांना स्मरणपत्र देणार
सध्या शिवाजी नगर पुल तोडल्यामुळे नागरिकांना पर्यायी मार्ग म्हणून सुरत रेल्वे गेटचा वापर करावा लागत आहे. मात्र हा मार्ग शिवाजीनगरवासियांना पायी दूरचा असल्याने तहसिल कचेरीकडून परिसरातील आबालवृद्ध रेल्वे रुळ ओलांडून मार्गक्रमण करत आहेत. सोमवारी तर अंत्ययात्रा रेल्वे रुळावरुन गेल्याचे प्रसिद्धी माध्यमात छापून आलेले आहे.या रस्त्यावर रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे गेट बसवावे, अशी मागणी यापुर्वीच मनपा प्रशासनाकडून रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली होती. मात्र अद्यापही येथे रेल्वे गेटच्या कामाला सुरुवात झालेली नाही. सद्यस्थितीत हजारो नागरिक आबालवृद्धांचा या मार्गावरुन वापर सुरु आहे.याबाबत मनपा आयुक्त डॉ. टेकाळे हे रेल्वेचे डीआरएम यादव यांना स्मरणपत्र देणार असल्याची माहिती शहर अभियंता सुनिल भोळे यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.