शिवसेनेची यादी मुख्यमंत्रीच तयार करतील!

0

उद्धव ठाकरे यांनी भाजपाला लगावला टोला
मुंबई :आगामी विधानसभा निवडणूकीत जागावाटप आणि जागांच्या अदला-बदलीवरून सत्ताधारी भाजपा व शिवसेनेमध्ये तिढा निर्माण झाला असल्याचे समोर आले आहे. युतीची चर्चा अंतिम टप्प्यात आली असली तर यंदा शिवसेनेला देण्यात येणाऱ्या जागा आणि संख्यांची यादी मुख्यमंत्री तयार करून देणार आहेत. त्यांनी यादी तयार करून दिली की ती पक्षासमोर ठेवीन आणि युतीची घोषणा होईल, असा जबरदस्त टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला लगावला आहे.


वांद्रे येथील “मातोश्री’ निवासस्थानी पत्रकारांशी उद्धव ठाकरे बोलत होते. महायुतीच्या जागावाटपाची चर्चा कुठपर्यत आली आहे, असा सवाल पत्रकारांनी केला असता उद्धव ठाकरे म्हणाले, युतीची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. यावेळी मी एक वेगळा मार्ग स्वीकारलेला आहे. मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे की शिवसेनेची यादी तुम्हीच तयार करा. त्यानुसार ते शिवसेनेची यादी तयार करताहेत. ती जागा आणि संख्या ते तयार करून मला देतील. मी ती पक्षासमोर ठेवीन आणि युतीची घोषणा होईल. उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यावर पत्रकारांमध्ये हास्यस्फोट झाला.


विधानसभा निवडणूकीची घोषणा कधीही होऊ शकते. मात्र, अद्यापही सत्ताधारी शिवसेना-भाजपा महायुतीच्या जागावाटपावर अद्यापही निर्णय झालेला नाही. त्यामुळे जागावाटपाबाबत अनेक दिवसांपासून उलटसुलट चर्चा सुरू आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून शिवसेना-भाजप जागावाटपाबाबत गैरसमज निर्माण करणारे विधान करण्यात आले होते. त्यामुळे शिवसेना नेते नाराज झाले होते. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जागांची अदलाबदल करण्याबाबतही विधान केले होते. भाजपकडूनच होत असलेल्या या विधानांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याला महत्व आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.