फडणवीसांकडून शिंदे अन् आकड्यांचा दाखला !
पुढचा मुख्यमंत्री कोणाचा?: सुत्राचा विषय विस्कटून सांगितला
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यात सध्या तरी युतीच्या राजकारणाची अपरिहार्यता आहे. त्यामुळे शत प्रतिशतचा नारा अमलात आणणे कठीण आहे. राज्यात भाजपला 51 टक्के मिळवण्याची खात्री असेल, तेव्हाच शत-प्रतिशतचा नारा प्रत्यक्षात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपला अभूतपूर्व यश मिळेल. मित्रपक्षांसह आम्ही गेल्या निवडणुकीत केलेल्या कामगिरीची पुनरावृत्ती करु. विधानसभा निवडणुकीतही महायुती एकत्र लढेल, असे फडणवीसांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना देवेंद्र फडणवीस यांनी लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत विविध विषयांवर सविस्तर भाष्य केले. केंद्रात पुन्हा सत्ता मिळाल्यावर मित्रपक्षांना वाऱ्यावर सोडले जाईल अशी चर्चा उगाच केली जाते. आम्ही मित्रपक्षांचा सन्मान करतो आणि यापुढेही करु. विधानसभा निवडणुकीला आम्ही महायुती म्हणून सामोरे जाऊ, अशी ग्वाही फडणवीसांनी दिली. भाजपच्या शत-प्रतिशत नाऱ्याचं काय झाले, या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीसांनी मतांचे गणित सांगितले. जेव्हा केव्हा आम्हाला 51 टक्के मते मिळण्याची खात्री होईल तेव्हाच आम्ही तसा विचार करु. ही हळूहळू होणारी प्रक्रिया आहे, असे फडणवीस म्हणाले. लोकसभेच्या जागावाटपावेळी महायुतीत बरीच रस्सीखेच झाली. लोकसभेची भरपाई विधानसभेत करु, असे भाजपकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सांगण्यात आले. त्यावरही फडणवीसांनी भाष्य केले. ‘लोकसभेच्या जागावाटपावेळी जागा सोडताना अडचणीत येतील याची कल्पना राष्ट्रवादीच्या नेतृत्त्वाला देण्यात आली होती. विधानसभेच्या जागावाटपात मित्रपक्षांचा सन्मान राखला जाईल. ज्या पक्षाच्या अधिक जागा निवडून येतील, त्यांचाच मुख्यमंत्री होईल असे सूत्र असेलच हे सांगता येणार नाही,’ असे म्हणताना फडणवीसांनी आताच्या परिस्थितीकडे लक्ष वेधले. आताही भाजपचे 115 आमदार असतानाही एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद देण्यात आले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रिपदाचा निर्णय भाजपचे संसदीय मंडळ घेईल, असे फडणवीस म्हणाले.
आमची ताकद वाढली
भाजप आणि शिंदेसेना मिळून पुरेसे संख्याबळ असतानाही अजित पवारांची गरज का भासली, या प्रश्नालाही फडणवीसांनी उत्तर दिले. विरोधकांची मोट बांधून शरद पवार भाजपला एकाकी पाडण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे आम्हाला रणनीती आखावी लागली. आम्हाला ताकद वाढवायची होती. त्यामुळेच अजित पवारांना सोबत घेतले. शेवटी आम्हालाही राजकारण करायचे आहे. अजित पवार सोबत आल्याने पश्चिम महाराष्ट्रात आमची ताकद वाढली, असे फडणवीस यांनी सांगितले.