शासकीय जागेवरील अतिक्रमण भोवले; नगरदेवळा येथील उपसरपंच विलास पाटील अपात्र

0

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

नगरदेवळा ता. पाचोरा येथील विद्यमान उपसरपंच विलास राजाराम पाटील (भामरे) यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केलेल्या घरात राहात असल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सर्व पुराव्यांची तपासणी करत तक्रारदार दिपक विजयसिंग परदेशी  यांच्या बाजूने निकाल देत विलास पाटील यांचा अर्ज अवैध ठरवत सदस्य पदावरुन अपात्र घोषीत केले आहे.

विलास पाटील यांनी नगरदेवळा वार्ड क्रं.२ मधून सर्वसाधारण प्रवर्गातुन निवडणूक लढविली होती. सदर व्यक्तीविरुद्ध तक्रारदार दिपक परदेशी यांनी २ फेब्रुवारी २०२१ रोजी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम १४ (ज-३ ) अन्वये शासकीय जागेवर अतिक्रमन करून राहत असून त्याला अपात्र करून अतिक्रमण काढण्यात यावे, अशी तक्रार जिल्हाधिकारी जळगांव यांच्याकडे दाखल केली होती. यात विलास पाटील यांनी नगरदेवळा येथील गट क्रं. १३५ / १ अ  येथील सरकार नवीन गावठाण साठी संपादीत केलेल्या जागेवर बेकायदा अतिक्रमण केल्याने तसेच ग्रामपंचायत नमुना नं. ८  मालमत्ता क्रं. ३८६१ येथे दुमजली इमारत बांधलेले असल्याचे निदर्शनास आले आहे.

विषेश म्हणजे येथील  ग्रामविकास अधिकारी यांनी त्यांना अतिक्रमण काढून घेण्याबाबत लेखी स्वरूपाची नोटीस दिली होती तरी देखील त्यांनी अतिक्रमण काढलेले नाही. तसेच त्यांनी अतिक्रमण करून राहत नसल्याचा कोणताही ठोस पुरावा सादर केलेला नाही. जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या अहवालानुसार त्यांनी अतिक्रमण केले असल्याचे सिध्द होते. या सर्व पुराव्यांची सखोल चौकशी करून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सदर सदस्याला शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहत असल्याचे सिद्ध होत असल्याने अपात्र घोषित केले आहे. उपसरपंच विलास पाटील अपात्र झाल्याने नगरदेवळा ग्रामपंचायत च्या भाजपच्या सत्तेला सुरुंग लागले असल्याचे गावात बोलले जात आहे. तक्रारदार यांचेकडून अ‍ॅड. प्रल्हाद बी. पाटील यांनी तर विलास पाटील यांचेकडून अ‍ॅड. रणसिंग एस. राजपूत यांनी कामकाज पाहिले.

Leave A Reply

Your email address will not be published.