विकासाबरोबर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नाला न्याय दिल्याचे समाधान – नगराध्यक्ष करण पाटील

0

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

गेल्या सात-आठ वर्षांपासून पालिकेत अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळताना शहरातील गरजू आणि मूलभूत कामांना नेहमीच प्राधान्य देत विकासाच्या माध्यमातून जनतेची सेवा केली. नगरसेवक व पालिकेचे कर्मचारी यांची अनमोल साथीमुळे शहराच्या विविध महत्वकांक्षी योजना पूर्ण केल्यात.

रस्ते, गटारी, बालोद्यान, क्रीडासंकुल, पिण्याचा पाण्याचा प्रश्न अशा मूलभूत व गरजू प्रश्नांना न्याय देण्याची भूमिका आजवर घेतली. हे काम करीत असताना  नगर परिषद कार्यालय कर विभाग, बांधकाम विभाग व नगररचनाकार विभाग यांची बैठक व्यवस्था करण्याचा प्रश्न बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित होता, त्यासाठी नगरपालिकेचे वाचनालय इमारत तळ मजला येथे बांधकाम, नगर रचना व कर विभागाच्या जागेसाठी  भाडेतत्वावर देण्यात आलेले गाळे खाली करून कार्यालयासाठी त्या इमारतीची दुरुस्ती व रंग रंगोटी करुन  सुसज्ज असे कार्यालय स्थापित करून करदात्यांची होणारी गैरसोय थांबण्यासाठी या विभागांची निर्मिती करून कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नाला न्याय दिल्याचे समाधान असल्याचे प्रतिपादन लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पाटील यांनी केले. दि. 16 रोजी करविभाग, नगररचना विभाग व बांधकाम विभाग यांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी मुख्याधिकारी ज्योती भगत पाटील, उपनगराध्यक्ष दीपक अनुष्ठान, नगरसेवक बापू महाजन, संजय पाटील, नगरसेवक पी. जी. पाटील, प्रकाश माळी, भैय्या चौधरी, नगरसेविका जयश्री बडगुजर, आशिष शिरोळे, अमोल चौधरी यांच्यासह पालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.

याप्रसंगी नगराध्यक्ष पाटील म्हणाले की, शहरातील विकास कामांचा कोणताही गाजावाजा न करता विकास कामांना प्राधान्य दिले. शहरातील ज्येष्ठ नागरिकांना चौकाचौकात बसण्याची सोय व्हावी यासाठी खासदार उन्मेष पाटील यांच्या माध्यमातून सिमेंटचे बैठक व्यवस्था देण्याचा प्रयत्न केला. येणाऱ्या काळात पालिकेच्या माध्यमातून अनेक योजना कार्यान्वित करण्याचा आपला व आपला वेळोवेळी प्रयत्न राहील असे देखील ते म्हणाले.

यावेळी कर्मचाऱ्यांनी तीन विभाग हे सुसज्ज होत असल्याचे समाधान व्यक्त करून कामात गतिमानता निर्माण होईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. तर मुख्यधिकारी ज्योती भगत यांनी पालिकेच्या माध्यमातून शहरवासीयांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.