वडिलांचा मार खाऊन केली ‘श्रीं’ची स्थापना !

0

माध्यमिक शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील यांच्या आठवणीतील गणेशोत्सव

जळगाव (प्रतिनिधी) : वडील गावात पाणी सोडण्याचे काम करायचे…यामुळे कुटूंबाची आर्थिक परिस्थिती अतिशय बेताचीच…सातवीत शिकत असतांना घरात श्री गणेशाची स्थापना करण्यासाठी वडिलांकडे मूर्ती घेवून देण्याचा आग्रह केला…मात्र, आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे वडिलांनी नकार दिला…माझा हट्ट वाढला…वडिलांनी बेदम मारले…त्यामुळे हा गणेशोत्सव आयुष्यभर स्मरणात असल्याची आठवण जि.प.चे माध्यमिक शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील यांनी सांगितली. लोकशाहीच्या गणरायांची आरती आज शिक्षणाधिकारी श्री.पाटील यांच्याहस्ते करण्यात आली. याप्रसंगी शिक्षणविस्तार अधिकारी गणेश शिवदे उपस्थित होते.

वडिलांनी मारल्यानंतरही गणपतीची स्थापना करायचीच हा माझा निर्धार कायम होता…आणि मी मातीची मूर्ती तयार केली…आईची माया वेडी असते…मी तयार केलेल्या मातीच्या मूर्तीला आईने गेरूने रंगविले…या मूर्तीची मी गणपती म्हणून चाळीसगाव तालुक्यातील पातोंडा गावातील घरात स्थापना केली. मात्र, मी आणि माझ्या आई व्यतिरिक्त कुणीच या मुर्तीला गणपती मानायला तयार नव्होते…अनेकांनी या मूर्तीला हनुमान संबोधले…मी मात्र दहा दिवस गणपती म्हणूनच या मूर्तीची मनोभावे पुजा केली…माझी गणेश भक्ती पाहून वडिलांनी नंतर दरवर्षी गणपतीची मूर्ती घेण्याची परंपरा सुरू केली…ती आज पर्यंत कायम आहे…शासकीय अधिकारी म्हणून काम करतांना आता दरवर्षी आपल्या घरात दगडूशेठ हलवाई गणपतीची प्रतिकृती असलेल्या मूर्तीची स्थापना करीत असल्याचे बी.जे.पाटील यांनी सांगितले.

ही परंपरा आता सातवीत शिकणाऱ्या माझ्या मुलाने यंदापासून पुढे सुरू केली आहे. गणेश स्थापना आपणच करणार तुम्ही सर्वसाहित्य घेवून पुजेला बसा असे मुलाने सांगितले…मी चक्रावून गेलो…सातवीत शिक्षण घेणारा हा मुलगा आता पुजा कशी सांगणार? याचे मलाही कुतूहल होते. मात्र, नतर त्याने सरळ माझ्या मोबाईलवर युटयूब ऑन करून गणेश स्थापनेचा विधी सुरू केला…गणेशोत्सवाचे बदललेले स्वरूप मी माझ्या घरातच अनुभवात होतो आणि मुलात मी स्वत:ला पहात होतो असे श्री.पाटील यांनी सांगितले.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.