राष्ट्रवादीतर्फे महापालिकेला 15 दिवसांचा अल्टीमेटम

0

जळगाव शहरातील खड्डेमय रस्त्यांचा सर्वत्र बोलबाला होतोय. विधीमंडळ अंदाज समितीतर्फे प्रशासनावर ताशेरे ओढले. कर भरणाऱ्या नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी महापालिकेचीच आहे असे आदेश दिले. जळगावच्या खराब रस्त्यांबाबत आता महाविकास आघाडीतील एक घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस मैदानात उतरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जळगाव महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वात परवा सोमवारी महापालिका गेटवर आंदोलन करण्यात आले.

आंदोलनात ज्या घोषणा दिल्या. त्या लक्ष वेधून घेत होत्या. ‘गांधी लढे चोरोसे, हम लढते है चोरोसे’ या घोषणेने महापलिका परिसर दणाणून सोडले. महापालिका गेटवर जोरदार आंदोलन होत असल्याने शेवटी महापौर आणि उपमहापौर गेटवर येऊन आंदोलकांच्या व्यथा ऐकल्या. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर महापालिका आयुक्त सतिष कुळकर्णी यांनी आंदोलकांची भेट घेतली. तेव्हा जळगाव शहरातील रस्ते 15 दिवसात दुरूस्त करण्यात येतील असे आश्वासन दिले होते. परंतु फक्त आश्वासनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते थांबले नाहीत तर 15 दिवसात रस्ते पूर्ण झाले नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे महापालिकेला कुलूप ठोकण्यात येईल. असा सज्जड दम आंदोलकांनी आयुक्तांना दिला. त्यामुळे पुढचे 15 दिवस महापालिका प्रशासनासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. कारण संपूर्ण जळगाव शहरातील रस्त्यांची चाळणी झाली असून महापालिका प्रशासनाकडून युध्द पातळीवर त्याची कशी दुरूस्ती केली जाते ही कसरतच म्हणावी लागणार आहे. परंतु जळगावच्या रस्त्यावरून पाऊस नसतांना पायी चालणे तसे दुचाकी वहान चालविणे मोठे जिकीरीचे बनले आहे. पाऊस झाल्यावर तर जळगावात चालण्याबरोबर वहान चालविणे महाकठीण काम आहे. तरीसुध्दा जळगावच्या नागरिकांच्या सहनशिलतेला दाद द्यावी लागेल. त्यामुळे 15 दिवसाच्या कालावधीत प्रशासनातर्फे कशा पध्दतीने रस्ते सुधारले जातात याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

जळगाव महानगरपालिकेत भाजपची असलेली सत्ता शिवसेनेने उलथून टाकली. शिवसेनेचा महापालिकेवर भगवा फडकलेला महापौर – उपमहापौर शिवसेनेचे आरूढ झाले. सत्ता बदल सुमारे होऊन सहा महिन्याचा कालावधी लोटला तरी येरे माझ्या मागल्या प्रमाणेच महापालिकेचा कारभार चालू आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार असल्याने, त्यातच नगरविकास मंत्री हे शिवसेनेचेच असल्याने जळगाव शहराच्या विकास कामाला गती मिळेल ही अपेक्षा होती. तथापि ती अपेक्षा फोल ठरली. मध्यंतरी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले. शिंदे यांनी महापालिकेत पालकमंत्री, महापौर, उपमहापौर, नगरसेवक अधिकारी यांची आढावा बैठक घेतली. आढावा बैठकीत विकास कामांपेक्षा राजकारणावरच चर्चा जास्त झाली. शेवटी मुंबईत आढावा बैठक घेण्याचे ठरले. परंतु मुंबईच्या आढावा बैठकीचा मुहूर्त अद्याप ठरलेला दिसत नाही. त्यामुळे विकास कामाच्या संदर्भात जी तळमळ पाहिजे ती मंत्री एकनाथ शिंदेच्या दौऱ्यातील बॉडी लँग्वेजवरून तरी दिसली नाही हे कटु सत्य म्हणावे लागेल.

विकास कामे का रेंगाळली आहेत या प्रश्नाचे उत्तर सुध्दा शिंदेंनी कुणाला विचारले नाही. कारण अमृत योजनेचे काम रेंगाळले. भुयारी गटारीचे काम रेंगाळले. शहरातील शिवाजीनगर  रेल्वे पुलाचे काम रेंगाळले, शहरातील राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गोगलगाय पध्दतीने संथपणे सुरू आहे. शहरातील रस्ते दुरूस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम खात्याची  की महापालिकेची यावरच आरोप – प्रत्यारोप सुरू आहेत. त्यामुळे विका कामे मात्र ठप्प आहेत. त्यात किमान शहरातील रस्ते दुरूस्ती हा जिव्हाळ्याचा प्रश्न युध्द पातळीवरून महापालिकेने केले पाहिजेत. पररु तेही केले जात नाही म्हणून शिवसेनेचा मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने शंड्ड ठोकून आता मैदानात उतरला आहे. त्यांनी 15 दिवसात रस्त्यांची दुरूस्ती झाली नाही तर महापालिकेला कुलूप ठोकण्याचा इशारा दिलेला आहे. म्हणजे मैत्रीच्या संबंधात बाधा आल्याशिवाय राहणार नाही. तसेच आगामी काळात महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस ॲग्रेसिव्हपणे मैदानात उतरल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळेला शिवसेनेला पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही.

शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांपासून किमान महापाकिलेच्या पातळीवर तरी दुरावल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आता 15 दिवसांचा अल्टीमेटम कशा पध्दतीने सोडवला जातो. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खरे पाहिले तर भाजप सध्या विरोधात भाजपतर्फे महापालिकेच्या संदर्भात रान उठविले पाहिजे. तशी नागरिकांची सुध्दा अपेक्षा आहे. पण भाजपमध्ये एकमेकांत सुसंवाद नाही आणि त्यांना मार्गदर्शन करणारे नेतृत्वही कमी पडतेय असेच म्हणावे लागेल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.