राजकारण व समाजकारणात युवकांची भूमिका महत्वाची : ना. गुलाबराव पाटील

0

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हा मूलमंत्र देऊन सुरू केलेल्या पक्षाचे कार्य आज प्रचंड प्रमाणात विस्तारले असून यात युवकांचा मोठ्या प्रमाणात वाटा आहे. यामुळे युवा सैनिकांनी जनहिताची कामे करून पक्षाची ध्येयधोरणे आणि राज्य सरकारने केलेली कामे जनतेपर्यंत परिणामकारक पध्दतीत पोहचवण्याचे काम करावे असे आवाहन आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. तालुक्यातील बिलखेडा, सारवे, जांभोरे, भोणे आणि कंडारी येथे आठ युवा सेनेच्या शाखांच्या कार्यक्रमाच्या उदघाटनप्रसंगी ते बिलखेडा येथे जाहीर कार्यक्रमा प्रसंगी बोलत होते. याच कार्यक्रमात परिसरातील अनेकांनी शिवसेनेत प्रवेश घेतला.

बिलखेडा येथे जाहीर सभा

याप्रसंगी बिलखेडा येथे मनोगत व्यक्त करतांना ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, शाखा हा शिवसेनेचा आत्मा आहे. शिवसेनेची  शाखा हे समाजकार्य करण्याचे एक मोठे माध्यम होते आणि आजही आहे. याला आता युवासेनेची जोड मिळालेली आहे. खरं तर राजकारणात युवकांची भूमिका ही अतिशय महत्वाची आहे. युवकांनी राजकारणाकडे सकारात्मकतेने पहावे, आणि समाजसेवेचे एक उत्तम माध्यम म्हणून याचा वापर करावा. प्रत्येक युवासेनेच्या शाखेने आपला फलक लावावा. यावर पक्षाची ध्येय-धोरणे; विचार, ताज्या घडामोडी आणि राज्य सरकारने केलेल्या कामांची माहिती ठळकपणे नमूद करावी. कोविडच्या काळात शिवसेना आणि युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी अतिशय मोलाची भूमिका बजावली असून कोविड पश्‍चात काळात देखील याच प्रकारे भूमिका बजवावी असे आवाहन करून बिलखेडा गावात आजवर सुमारे दीड ते दोन कोटी रूपयांच्या विकासकामांना मंजुरी मिळालेली आहे. येत्या काळात व्यायामशाळा, स्मशानभूमि, बिलखेडा ते सारवे रस्ता या कामांना मार्गी लावणार असल्याची ग्वाही देखील त्यांनी दिली. जलजीवन मिशनच्या माध्यमातून येथील पाणी पुरवठा योजनेला गती देण्यात येणार असल्याचे आश्‍वासन देखील त्यांनी दिले. तर, आम्ही तर पाणी पाजूच….मात्र आपण आम्हाला मतदानरूपी आशीर्वाद द्यावा असे पालकमंत्री मिश्कीलपणे बोलताच उपस्थितांमध्ये हास्याची लकेर पसरली.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज तालुक्यातील बिलखेडा, सारवे, जांभोरे, भोणे आणि कंडारी येथे युवासेनेच्या आठ शाखांचे उदघाटन करण्यात आले.

 अशी आहे युवासेनेच्या शाखांची कार्यकारणी 

बिलखेडा येथील शाखाप्रमुख गोपाल पाटील तर उपशाखाप्रमुख समाधान पाटील तर दुसर्‍या शाखेचे प्रमुख अनिल सोनवणे आणि उपशाखाप्रमु्ख सुनील पिंपळे यांची नावे जाहीर करण्यात आली. यासोबत जांभोरा येथील शाखाप्रमुख शुभम चव्हाण तर उपशाखाप्रमुख स्वप्नील परदेशी; सारवे येथे शाखाप्रमुख किशोर पाटील आणि उपशाखाप्रमुख समाधान पाटील; कंडारी येथे शाखाप्रमुख युसुफ पटेल आणि उपशाखाप्रमुख शाहरूख पटेल यांची कार्यकारीणी जाहीर करण्यात आली. भोणे येथे युवासेनेच्या दोन शाखा उघडण्यात आल्या असून यातील एका शाखेचे प्रमुख गजानन फुलपगार आणि उपशाखाप्रमुख प्रदीप पाटील तसेच दुसर्‍या शाखेचे प्रमुख शरद पाटील आणि उपशाखा प्रमुख महेश पाटील यांची निवड जाहीर करण्यात आली आहे.या सर्वांचे पालकमंत्र्यांसह सर्व शिवसेना व युवासेना पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.

या कार्यक्रमात परिसरातील अरूण भदाणे, निलेश भदाणे, रावसाहेब भदाणे, सागर राजपूत; सागर भदाणे, मोहन भदाणे, यांच्यासह  इतरांनी शिवसेनेत प्रवेश केला. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच बिलखेड्याचे मूळ रहिवासी असणारे राजेंद्र भदाणे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल  त्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बिलखेडा येथील शाळेच्या वॉल कंपाऊंडसह डिजीटल वर्गाचे लोकार्पण देखील ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, नगरपालिका गटनेते पप्पू भावे, युवासेना जिल्हा प्रमुख शिवराज पाटील, युवासेना तालुका प्रमुख चेतन पाटील, उपतालुका भाऊसाहेब पाटील, दिपक भदाणे, डॉ. संदीप पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख गजानन पाटील; पं. स. सभापती प्रेमराज पाटील, माजी सभापती डी. ओ. पाटील, नवल पाटील , ज्येष्ठ पदाधिकारी, पुरूषोत्तम पाटील, सरपंच डॉ. दीपाली काटे-पाटील, उप दिलीप पाटील, महिला आघाडी जनाआक्का पाटील, उपतालुका प्रमुख मोतीआप्पा पाटील, प्रमोद पाटील भानुदास पाटील, मोहन पाटील, भगवान पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेवानिवृत्त शिक्षक देविदास भदाणे यांनी केले. त्यांनी गावात व परिसरात विकासनिधी दिल्याबद्दल पालकमंत्र्यांचे आभार मानले. सूत्रसंचालन उपशिक्षक योगेश्‍वर भदाणे यांनी केले. तर आभार युवासेना तालुका प्रमुख चेतन पाटील व सरपंच दीपाली काटे-पाटील यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.