मु. जे. महाविद्यालयात मराठी साहित्य अभिवाचन स्पर्धा

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

अभिवाचनाच्या माध्यमातून आपले उच्चारशास्त्र विकसित होते. तसेच आपल्याला संहितेचे सूक्ष्म आकलन होते. त्यामुळे कलाकृतीचा आशय अधिक परिणामकारक पद्धतीने श्रोत्यांपर्यंत पोहोचवता येतो. म्हणून साहित्याच्या अभिवाचनाचे उपक्रम आवश्यक आहेत असे मत केसीई सोसायटीचे सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर यांनी व्यक्त केले. पूज्य पुरुषोत्तम दारव्हेकर स्मृतीप्रित्यर्थ रंगगंध कलासक्त न्यास चाळीसगाव आणि मूळजी जेठा महाविद्यालय यांच्या वतीने अखिल भारतीय मराठी साहित्य अभिवाचन महोत्सवाची जळगाव केंद्रावरील प्राथमिक फेरी मूळजी जेठा महाविद्यालयात संपन्न झाली. या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

या अभिवाचन स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत एकूण सहा संघांनी सहभाग घेतला. यामध्ये आदित्य प्रतिष्ठान जळगाव यांनी विद्या कावडकर लिखित ‘रंग पळसाचा’ या संहितेचे, केसीई सोसायटी संचलित ए.टी. झांबरे विद्यालयाने चंद्रकांत भंडारी लिखित ‘सोलमेट हिरा’ अप्पासाहेब विश्वास राव भालेराव प्रतिष्ठान, जळगाव यांनी शरद भालेराव लिखित ‘कबरीवरचं फुल’, अखिल भारतीय साहित्य परिषद,जळगाव शाखा यांनी ‘बटाट्याची चाळ एक चिंतन आणि न गंगासदृश्यम तीर्थम’ ही संहिता, जिंदगी फाउंडेशन जळगाव यांनी रवींद्र पांढरे लिखित ‘डंगरा’ ही कथा व कला साहित्य व सांस्कृतिक मंडळ मू. जे. महाविद्यालय जळगाव यांनी जी.ए. कुलकर्णी यांच्या ‘राधी’ या कथेचे अभिवाचन केले. ह्या साहित्य अभिवाचन स्पर्धेचे परीक्षण श्री. चिंतामण पाटील व डॉ.शमा सराफ यांनी केले. प्रत्येक प्रयोगाला २५ ते ३० मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. सर्वाधिक महत्त्व वाचिक अभिनयाला असल्याने सादर झालेल्या अभिवाचनापैकी योगिता पाटील, नेहा पवार, शरद भालेराव, सृष्टी कुलकर्णी, डॉ.पुरूषोत्तम पाटील या पाच स्पर्धकांना उत्कृष्ट वाचिक अभिवाचनाची प्रमाणपत्रे देण्यात आली. तसेच साहित्य, कला आणि सांस्कृतिक मंडळ मूळजी जेठा महाविद्यालयाच्या संघाची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. या संघात प्रा. गोपीचंद धनगर, सिद्धी उपासनी, उर्मिला चौधरी, चंचल धांडे यांनी कथालेखक जी.ए. कुलकर्णी यांची ‘राधी’ या कथेचे अभिवाचन केले. अंतिम फेरीत सहभागी होण्यासाठीचे पत्र मान्यवरांच्या हस्ते या संघाला देण्यात आले.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण मू. जे. महाविद्यालयातील भाषा प्र शाळेचे संचालक प्रो. भूपेंद्र केसूर यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलतांना त्यांनी अभिवाचन संहितेतील बारकावे समजून घेण्यास मदत करते. अभिवाचन करतांना शब्दांचा अर्थ समजून घेतला पाहिजे असेही ते म्हणाले. सततच्या वाचनाने आपल्या आकलनशक्तीचा आणि उच्चारशास्त्राचा विकास होतो असे सांगितले. ह्या प्राथमिक फेरीत विजयी झालेल्या संघाची अंतिम फेरी दि. २४,२५, २६ फेब्रुवारी २०२३ दरम्यान रंगगंध कलासक्त न्यास चाळीसगाव येथे होणार आहे.

सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन डॉ. योगेश महाले यांनी केले. यावेळी स्पर्धेच्या स्थानिक संयोजक डॉ. विद्या पाटील, डॉ. विलास धनवे, प्रा. गोपीचंद धनगर, डॉ. अतुल पाटील, प्रा. विजय लोहार उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्रा. हेमंत पाटील, प्रा. वैभव मावळे, दिनेश माळी, प्रा. कपिल शिंगाणे यांचे सहकार्य लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.