महागड्या दुचाकीचा हट्ट न पुरवल्याने १८ वर्षीय युवकाची आत्महत्या

0

जळगाव : महागड्या दुचाकीचा हट्ट न पुरवल्याने १८ वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शहरातील सिंधी कॉलनीत रविवारी संध्याकाळी घडली़. कमल भिषणचंद तुलसी (१८, रा़ सिंधी कॉलनी, मूळ रा. फैजपूर) असे मयत तरूणाचे नाव आहे़

याबाबत अधिक असे की, काही दिवसांपूर्वी महागडी दुचाकी खरेदी करून देण्यासाठी आई-वडीलांना मुलाने सांगितले. परिस्थिती बेताची असल्याने महागडी दुचाकी कशी घेवून देणार? हा प्रश्न उभा ठाकल्याने त्याला महागडी दुचाकीचा हट्ट करू नको, असे पालकांनी सांगितले हाेते. मात्र, हट्ट पूर्ण न झाल्याने कमल याने रविवारी सायंकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. भिषणचंद जसूमल तुलसी हे मुळचे फैजपूर येथील रहिवासी आहेत. वर्षभरापूर्वी ते जळगाव शहरातील सिंधी कॉलनी भागात कुटुंबासह राहण्यासाठी आले. त्यांच्या मालकीचे दिक्षीत वाडीत स्पेअर पार्टचे दुकान अाहे. हे दुकान मुलगा कमल सांभाळत होता. दरम्यान, काही दिवसांपासून कमल हा पालकांकडे सुमारे एक ते दीड लाखाची महागडी दुचाकी खरेदी करून देण्यासाठी हट्ट करीत होता. परंतु, लॉकडाऊन असल्याने व्यवसायही ठप्प पडला. त्यात परिस्थितीही नाजूक, त्यामुळे त्यास महागडी दुचाकी घेवू नको, असे पालकांनी सांगितले हाेते.

दरम्यान, रविवारी सायंकाळी सुमारे ५ वाजेच्या सुमारास कमल याने आई-वडीलांना पायमोजे घेवून यावे, असे सांगितले. त्यामुळे पालक सिंधी कॉलनी स्टॉपजवळ मुलासाठी पायमोजे घेण्यासाठी गेले असता, कमल याने घरात कुणीही नसताना गळफास घेवून आत्महत्या केली. आई-वडील घरी येताच त्यांना मुलाने गळफास घेतल्याचे दिसताच हंबरडा फोडला. नंतर त्याला शेजारच्या मदतीने खाली उतरवून जिल्हा रूग्णालयात नेले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासणीअंती मृत घोषित केले. रुग्णालयात नातेवाइकांनी आक्रोश केला. दरम्यान, कमल याच्या पश्चात आई-वडील व दोन विवाहित बहिणी आहेत. दरम्यान, कमल तुलसी याने महागड्या दुचाकीसाठी अात्महत्येचे पाऊल उचलल्याचे कारण समाेर येत अाहे. त्यामुळे समाजमन सुन्न झाले असल्याचे चित्र येथे दिसून अाले.

Leave A Reply

Your email address will not be published.