भारताचा पाकवर एअर स्ट्राइक; हद्दीत घुसून दहशतवादी तळावर हल्ले

0

नवी दिल्ली :- जम्मू-काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. अशातच भारतीय वायूसेनेच्या मिराज या लढावू विमानांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर १००० किलोग्रॅम वजनाचे बॉम्ब फेकल्याचे वृत्त ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिले आहे. १२ मिराज विमानांनी पाक हद्दीत घुसून दहशतवादी तळावर हल्ले केले. पाकिस्तान हद्दीत घुसून भारतीय वायूसेनेने केलेली ही आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात येते.

‘एएनआय’ने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास मिराज २००० ही लढाऊ विमाने पाकिस्तानची हद्दी ओलांडून गेली आणि त्यांनी दहशतवादी तळांचा नायनाट केला. पाकिस्तानच्या नियंत्रण रेषेपाशी असणाऱ्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर हा भारतीय वायुदलाने हल्ला केला आहे. पुलवामा दहशतवादी आत्मघाती हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. या हल्ल्यानंतर १२ दिवसांनी पाकिस्तानला हा झटका दिला आहे.

पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ता मेजर जनरल आसिफ गफूर यांनी ट्विट करत भारतावर हा आरोप केला आहे. भारताने नियंत्रण रेषेचे उल्लंघन केल्याचा आरोप केल्यानंतर गफूर यांनी आणखी एक ट्विट केले. भारतीय हवाई दलाने मुझफ्फराबाद भागातून घुसखोरी केली असे त्यांनी पुढील ट्विटमध्ये म्हटले आहे. मात्र, पाकिस्तानी लष्कराने योग्य वेळी भारताला प्रत्युत्तर दिल्याचा उल्लेखही त्यांनी ट्विटमध्ये केला आहे. या घटनेत कोणतेही नुकसान झाले नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.