भाजपच्या आक्रोश मोर्चाद्वारे शक्तीप्रदर्शनाचा प्रयत्न

0

जळगाव जिल्हा भाजपच्यावतीने सोमवारी जळगावात जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा काढला. या मोर्चाचे नेतृत्व माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी केले. जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी तसे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर हा मोर्चा काढण्यात आला. माजी मंत्री एकनाथराव खडसे भाजप मधून बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदाच मोर्चाद्वारे शक्तीप्रदर्शन करण्यात आले.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हा मोर्चा असला तरी दिवाळीच्या पहिल्याच दिवशी शहरातील नागरिकांचे मात्र हाल झाले. त्यातच दुपारी 12 वाजता सुरू होणारा मोर्चा प्रत्यक्षात दुपारी 3 वाजता सुरू झाला. दुपारी 12 ते 2 म्हणजे तब्बल दोन तास मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या आ. गिरीश महाजनांसाठी वाट पहात मोर्चेकरी ताटकळत बसले होते. त्यामुळे सकाळी 11 वाजेपासून वाहतुकीची कोंडी झाली होती. दिवाळी सणाच्या खरेदीची शहर वासीयांची गर्दी अन्‌ त्यात वाहतुकीची कोंडी झाल्याने नागरिक हैराण झाले होते. वरून ऊन आणि रस्त्यावरील धूळ यामुळे नागरिकांची त्रेधा तिरपीठ उडाली. जळगावकर नागरिकांची मोर्चेकऱ्यांवर मात्र खप्पा मर्जी होती. मोर्चाच्या विलंबामुळे मोर्चात सामील झालेले शेतकरी सुध्दा त्रस्त होते. एकंदरीत मोर्चाची वेळ पाळली गेली नाही. त्यामुळे हा प्रकार बघावयास मिळाला. असो दुपारी 3 वाजता निघालेल्या मोर्चाचे नेतृत्व स्वत: गिरीश महाजन यांनी केले. विशेष म्हणजे मोर्चातील ट्रॅक्टर स्वत: चालवत होते. त्यातच ते जामनेरपासून जळगावपर्यंत स्वत: ट्रॅक्टर चालवत आले होते. गिरीश महाजन असे साहस करण्यात वाकबगार आहेत. एकदा जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात एक मोठा ट्रॉला बंद पडला होता. त्यावेळी वाहतूक कोंडीत अडकलेले गिरीश महाजन हे पालकमंत्री असतांना कारमधून खाली उतरले. ट्रॉलाचा ताबा घेतला आणि रस्त्यावरून त्या ट्रॉलाला बाजूला केले. गिरीश महाजन यांनी अनेकवेळा असे धाडस केले आहे. तथापि कालच्या मोर्चात ट्रॅक्टर स्वत: चालवून मी शेतकरी असल्याचे दाखवून दिले. परंतु ट्रॅक्टर चालवतांना त्यांच्या आजूबाजूला खा. रक्षा खडसे तसेच इतर भाजप नेते बसलेले होते.

गिरीश महाजन ट्रॅक्टर चालवतांना हसत असल्याने आक्रोश मोर्चाचे गांभीर्य दिसून आले नाही. शेतकऱ्यांसाठी असलेल्या आक्रोश मोर्चा असतांना हसणे शोभणारे नव्हते. यापूर्वी सुध्दा कोल्हापूर – सांगली जिल्ह्यात महापूर आला असतांना पाण्यात बोटीद्वारे जाऊन पहाणी केली आणि अनेकांचे प्राण वाचवले. तथापि पाण्यात बोटीद्वारे जातांना त्यांनी काढलेले सेल्फीचे फोटोग्राफ फार चर्चेचा विषय बनला होता. तसाच काहीसा प्रकार या आक्रोश मोर्चात दिसून आला.

भाजपच्या या आक्रोश मोर्चात किती मोर्चेकऱ्यांचा समावेश होता. हा एक वादाचा विषय बनला आहे. भाजपच्या आयोजकांतर्फे दावा केला जातो. 10 हजार मोर्चेकरी होते. परंतु पोलिस खात्यातर्फे मोर्चात 5 हजाराचा समावेश असल्याचे सांगितले जाते. या व्यतिरिक्त जाणकारांचा कानोसा घेतला तर ते म्हणतात. 3 ते 5 हजाराचा समावेश होता. याचा अर्थ 3 प्रकारचे दावे होत असले तरी मोर्चात सामील ट्रॅक्टरमुळे मोर्चा मोठा होता असे वाटते. तथापि, भाजपतर्फे पहिल्यांदाच जिल्हास्तरावर काढण्यात आलेल्या मोर्चाने लक्ष वेधून घेतले हे मात्र खरे आहे. दुपारी 12 ला दिलेली वेळ न पाळण्याचे एक कारण म्हणजे जिल्हाभरातून शेतकरी मोर्चात सामील होण्यासाठी विलंब झाला अन्यथा 12 वाजता मोर्चा काढला असता तर मोर्चातील शेतकऱ्यांची संख्या कमी दिसली असती. नियोजनाचा अभाव या मोर्चात मात्र जाणवला. नियोजन योग्य असते तर मोर्चाने आणखी लक्ष वेधून घेतले असते. ऊन आणि धूळ यांच्या त्रासाने मोर्चात सामील झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील यांना भोवळ आली होती. त्यांच्या बरोबर काही शेतकऱ्यांना सुध्दा त्याचा त्रास झाला. त्यामुळे आयोजकांनी यांचे भान ठेवायला हवे होते. मोर्चाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सभेत रुपांतर झाल्यावर गिरीश महाजनांनी महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचेवर हल्ला बोल केला. या मोर्चात भाषण करतांना खा.उन्मेश पाटील यांचा स्तर मात्र पालकमंत्री गुलाबराव पाटलांना पालकमंत्री नव्हे बालकमंत्री आहेत असे संबोधले. त्यांचे हे वक्तव्य टाळ्याखाऊ असले. तरी अनेकांना आवडले नाही. मुद्यांवर बोलण्याऐवजी गुद्यांवर बोलणे योग्य नाही. याबाबतीत असे हल्ले करण्यात गुलाबराव पाटील माहीर आहेत. तेव्हा असेच हल्ले करणे कितपत योग्य आहे. त्यामुळे मोर्चाचे गांभीर्य नेत्यांनी पाळले पाहिजे. एवढेच या निमित्ताने सांगावेसे वाटते.

Leave A Reply

Your email address will not be published.