Diwali 2021: जाणून घ्या.. लक्ष्मी पूजन विधी आणि शुभ मुहूर्त

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

दिवाळीमधील सर्वात महत्त्वाचा सण किंवा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. लक्ष्मीपूजन हा दिवस अत्यंत जल्लोषात साजरा केला जातो.   या दिवशी धन,लक्ष्मी माता आणि गणपती बाप्पाची पूजा केली जाते. तसेच धनदेवता कुबेराची देखील आराधना केली जाते. हा दिवस व्यापारी वर्गासाठी फार महत्त्वाचा असतो. यावेळी ते विशेष चोपडी पूजन देखील करतात.

🎙️सुमधुर आवाजात सविस्तर ऐका..👇

लक्ष्मीपूजनच्या दिवशी व्यापारी हे आपली चोपडी पूजन करुन आपल्या व्यवसायाच्या नव्या वर्षाची सुरुवात करतात. त्यासाठी ते नव्या वहीची (चोपडी) विधीवत पूजा करतात. यालाच चोपडी पूजन असं म्हटलं जातं. यावेळी घरोघरी लक्ष्मीचं देखील पूजन केलं जातं. घरातील पैसे, सोने-नाणे हे देवीच्या फोटोसमोर मांडून त्याची पूजा केली जाते. मात्र, या पुजेसाठी विशिष्ट असा मुहूर्त  असतो. जाणून घ्या यंदा लक्ष्मी पूजेचा नेमका विधी आणि मुहूर्त आहे.

लक्ष्मी पूजनचा शुभ मुहूर्त

दर्श अमावस्या, महालक्ष्मी कुबेरपूजन

दि. ४ नोव्हेंबर २०२१ सायंकाळी ६.०९ मिनिटापासून ते रात्री ८ वाजून २० मिनिटापर्यंत  शुभ मुहूर्त आहे.

दिवाळी २०२१ – शुभ मुहूर्त 

दिवाळी : ४ नोव्हेंबर, २०२१, गुरुवार

अमावस्या तिथि प्रारंभ: नोव्हेंबर ०४, २०२१ सकाळी ०६:०३ पासून.

अमावस्याची तिथी समाप्त: ०५ नोव्हेंबर २०२१ पर्यंत ०२:४४ पर्यंत.

लक्ष्मीपूजनासाठी शुभ वेळ 

सायंकाळी ६ वाजून ०९ मिनिटांपासून रात्री ८ वाजून २० मिनिटांपर्यंत

कालावधी: १ तास ५५ मिनिटे

प्रदोष काळ: १७:३४:०९ ते २०:१०:२७

वृषभ कालावधी: १८:१०:२९ ते २०:०६:२०

लक्ष्मीपूजनाची पूजा विधी 

लक्ष्मीपूजन ज्याठिकाणी करावयाचे आहे तिथे पूजेच्या स्थानी नवग्रह यंत्र ठेवा. त्यावर सोन्याचं किंवा चांदीचं नाणे ठेवा. हे उपलब्ध नसल्यास आपण काही नाणी किंवा पैसे देखील ठेऊ शकता. त्यानंतर गणपती आणि लक्ष्मी मातेची मूर्ती तबकात घेऊन त्याला दूध, दही आणि गंगाजल याने स्नान घालावं. त्यानंतर या दोन्ही मूर्ती स्वच्छ धुवून-पुसून मुख्य स्थानी विराजमान कराव्यात तसेच त्या फुलांनी देखील सजवाव्यात. त्यानंतर मूर्तीच्या उजव्या बाजूला तुपाचा किंवा तेलाचा पंचमुखी दिवा लावून पूजा संपन्न करावी.

चोपडी पूजनाचा विधी

चोपडी पूजन हे नेहमी शुभ मुहूर्तावर केलं गेलं पाहिजे. पूजा सुरु करण्याआधी वहीवर स्वस्तिक आणि श्री गणेशाय नम: असं लिहावं. यासोबतच एक नवी कापडी पिशवी घेऊन त्यात पाच हळकुंड, अक्षता, दुर्गा, धणे आणि दक्षिणा ठेवावी. त्या पिशवीवर देखील स्वस्तिकाचं चिन्ह काढून सरस्वती आईचं स्मरण करावं. त्यानंतर सरस्वती आणि लक्ष्मी मातेचं ध्यान करुन वहीवर गंध, पुष्प अर्पण करावं. त्यानंतर धूप, दिवा याने पूजन करावं. त्यानंतर नैवेद्य दाखविण्यात यावा.

अशी असावी लक्ष्मी देवीची मुर्ती

लक्ष्मी देवीची नेहमी गणपती बाप्पा किंवा सरस्वती देवीसोबतच पूजा करावी. असे केल्याने व्यक्तीला धन आणि विद्या दोन्हीची प्राप्ती होऊ शकेल. तसेच लक्ष्मी देवी, गणपती आणि सरस्वती यांचे एकत्रितरित्या केलेले पूजन अत्यंत कल्याणकारी ठरू शकते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. याशिवाय लक्ष्मी देवीची मूर्ती किंवा प्रतिमा नेहमी हसमुख स्वरुपाची असावी. लक्ष्मी देवीची क्रोध मुद्रा असलेली मूर्ती किंवा प्रतिमा कधीही घरी आणू नये. असे केल्याने मोठा तोटा तसेच आर्थिक फटका बसण्याची शक्यता असते, तसेच सर्वांना सोने-चांदीची मूर्ती घरी आणणे शक्य नसते. अशावेळी पितळ किंवा अष्टधातूची मूर्ती घरी आणावी. असे केल्यास लक्ष्मी देवीचे शुभाशिर्वाद मिळतात. धन-धान्याची कमतरता भासत नाही, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.

या दिशेला स्थापन करा

दिवाळीतील सर्वाधिक महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. वास्तुशास्त्रात, कोणत्याही देवतेचे पूजन करताना त्याची योग्य दिशा कोणती असावी, याबाबत सविस्तर विवेचन केल्याचे पाहायला मिळते. दिवाळीत लक्ष्मीपूजनावेळी लक्ष्मी देवी, सरस्वती आणि गणपती यांची स्थापना केली जाते. पूजनावेळी लक्ष्मी देवी, गणपती आणि सरस्वती यांची मूर्ती किंवा प्रतिमा उत्तर दिशेला स्थापन करावी, असे सांगितले जाते.

लक्ष्मीपूजनाची तयारी करताना

दिवाळीत लक्ष्मीपूजनाची तयारी करताना घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याची पाने, झेंडुची फुले यांचा समावेश असलेले तोरण आवर्जुन लावावे. घरात सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी गंगाजल, हळद, कापूर एकत्र करून घरातील प्रवेशद्वाराजवळ शिंपडावे. दिवाळीतील लक्ष्मीपूजन किंवा अन्य कोणत्याही पूजनावेळी देवघरात कुंकू किंवा शेंदूराचा वापर करून स्वस्तिक काढावे, असे सांगितले जाते. स्वस्तिक चिन्ह हे गणपती बाप्पाचे प्रतीक मानले जाते. स्वस्तिक चिन्हामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. सुख, समृद्धीत वृद्धी होते, असे सांगितले जाते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.