भाऊ पर्वाचा अस्त, ताई पर्वाचा उदय!

0

जळगाव (प्रतिनिधी):मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील तिढा अखेर  आज सकाळी सुटला. लोकशाहीने दिलेले वृत्त तंतोतंत खरं ठरले आहे. भाजपाने एकनाथराव खडसे यांच्या ऐवजी त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांना उमेदवार चौथ्या यादीत उमेदवारी जाहीर केली. अस्वस्थ असलेल्या नाथाभाऊंनी पक्षाच्या निर्णयाचे स्वागत करून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले. भाजप श्रेष्ठींच्या एका निर्णयामुळे मुक्ताईनगर मतदार संघातील भाऊ पर्वाचा अंत आणि राहिणीतार्इंच्या रूपाने ताई पर्वाचा राजकीय पटलावर उदय झाल्याचे मानले जात आहे.

रोहिणीतार्इंना सहकार्य करा!

कन्या ॲड. रोहिणी खडसे-खेवलकर यांना भाजपाने उमेदवारी जाहीर केल्यानंतर आ.खडसे यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली. आपल्या आजवरच्या चाळीस वर्षाच्या कारकिर्दीत जनतेने दिलेले सहकार्य रोहिणीताई यांनाही द्यावे, असे भावनिक आवाहन आ.खडसे यांनी केले.

यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की, पक्षाने मला उमेदवारी दिली नाही. शेवटच्या क्षणी का असेना माझी मुलगी रोहीणीस पक्षाने उमेदवारी घोषित केली. माझ्या चाळीसवर्षांच्या आजपर्यंतच्या राजकीय वाटचालीत ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे आभार मानून यापुढे रोहिणीच्या पाठीशी असेच कायम राहावे, असेही ते म्हणाले. रोहिणी यांना निवडून आणण्यासाठी परिश्रम करायचे असल्याचे ते म्हणाले. या बैठकीनंतर रोहिणीताई खडसे यांनी प्रचंड शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरला. भारतीय जनता पार्टीने आजपर्यंत जो आदेश दिला होता त्याचे पालन केलेले आहे. आजही पक्षाने जे आदेश दिले त्याचे पालन केले जाईल. काही आदेश कटू होते परंतु तरीही त्याचे पालन आपण केले आहे, असेही आ. खडसे याप्रसंगी म्हणाले.

रोहिणी खडसेंना अश्रू अनावर

नाथाभाऊ कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन करीत असतांनाच  याप्रसंगी रोहिणी खडसे यांना अश्रू अनावर झाले. गेल्या चार दशकांपासून नाथाभाऊंनी मुक्तार्इनगरातील प्रत्येक नागरिकाशी कौटूंबिक संबंध निर्माण केले आहेत. आज त्यांचा प्रत्येक शब्द प्रत्येक कार्यकर्त्यां श्वास रोखून ऐकत होता. वडीलांनी जेव्हा आता माझ्या प्रमाणेच मुलगी रोहिणीतार्इला साथ द्या असे आवाहन केले तेव्हा प्रत्येक कार्यकर्त्यांलाच भरून आले होते. वडिलांच्या जागेवर विराजमान होण्याचा मान रोहिणीतार्इंना आज मिळाला. मात्र, राजकारणातील या बाप माणसाचे निवृत्तीचे बोल ऐकून रोहिणीतार्इ आपल्या अश्रूंना रोखू शकल्या नाहीत. दरम्यान त्यांनी अर्ज दाखल केला असून याप्रसंगी आ. संजय सावकरे उपस्थित होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.