भडगावात एका केंद्रावरील फेरमतदानाचे पडसाद

0

अग्रलेख 

बिहार- उत्तरप्रदेशात गुंडांनी मतदान केंद्र ताब्यात घेऊन मतदान केल्याच्या बातम्या आपण वाचतो. त्यामुळे अमूक अमूक केंद्रावर फेरमतदान निवडणूक आयोगाने घेतल्याचेही अनेक प्रकार आतापर्यंत झाले. तथापि मतदान केंद्रातील केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांच्या चुकीमुळे मतदान संख्येत जो घोळ झाला त्या चुकीमुळे भडगाव शहरातील 107 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर आज 29 एप्रिल रोजी फेरमतदान घेण्यात आले. जळगाव लोकसभा मतदार संघातील भडगाव शहरातील जि.प.उर्दु प्राथमिक शाळेतील 107 क्रमांकाचे हे ते मतदान केंद्र होय. 23 एप्रिल रोजी येथे मतदान झाले होते. या केंद्रावर एकूण झालेल्या मतदानापेक्षा एकूण 53 मते जास्तीची आढळून आली होती. त्यामुळे या घोळाला या केंद्राचे अध्यक्ष अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील शिक्षक उद्धव पाटील आणि मतदान अधिकारी भडगावातील लडकूबाई विद्यालयातील शिक्षिका सुनिता नारायण देवरे या दोन्हा निवडणूक आयोगाने निलंबित केले. त्यांनी केलेल्या चुकीचे प्रायश्चित त्यांना मिळाले. हे दोघेही शिक्षक पेशातले असून निवडणूकीपूर्वी त्यांना विशेष असे ट्रेनिंग दिले जाते. त्यांनी इव्हीएम यंत्राप्रमाणेच बिनचूक कार्य केले पाहिजे ही अपेक्षा निश्चितच असणार. परंतु 53 मतांचा जो घोळ झाला ते व्हायला नको होते. आता या दोघांना सहा महिन्यानंतर कोर्टात जाऊन आपली बाजू मांडावी लागणार आहे. कोर्टाला त्यांची बाजू योग्य वाटली तर त्यातून ते निर्दोष सुटतील अन्यथा त्यांना कोर्टाकडून शिक्षासुद्धा होऊ शकते. निवडणूक आयोगाने आपली भूमिका अत्यंत चोखपणे पार पाडली. याबद्दल निवडणूक आयोगाचे अभिनंदन केले पाहिजे. परंतु त्याचा फायदा जळगाव लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविणार्याा उमेदवारांना झाला. म्हणजे दिनांक 23 एप्रिल रोजी जे मतदान झाले त्यापेक्षा जास्तीचे मतदान फेर मतदानात झाले. दिनांक 23 एप्रिल रोजी 502 एवढे मतदान झाले होते. परंतु आज 29 एप्रिल रोजी जे फेर मतदान घेण्यात आले तेव्हा त्या केंद्रावर 650 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. म्हणजे 23 ला झालेल्या मतदानापेक्षा 148 इतके मतदान यादाचे झाले हे विशेष होय. आजच्या फेरमतदानाच्या दिवशी जळगाव लोकसभा मतदार संघातील भाजपचे आ. उन्मेष पाटील आणि राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर हे भडगावात जातीने हजर राहून आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्याचाच परिणाम म्हणजे मतदानाचा टक्का वाढला. आज झालेल्या फेरमतदानाच्या वेळी सदर केंद्रावर प्रशासनातर्फे चोख व्यवस्था होती. त्यामुळे कसलाही अनुचित प्रकार न होता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.
फेर मतदानासंदर्भात निवडणूक आयोगाची उत्तम कामगिरी असली तरी त्याचे पडसाद स्थानिक पातळीवर मात्र वेगळ्यााच पद्धतीने उमटल्याचे दिसून आले. सदर 107 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर नियुक्त केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना आयोगाने निलंबित केले. केंद्राध्यक्ष अमळनेर तालुक्यातील डांगर येथील शिक्षक उद्धव पाटील व मतदान अधिकारी म्हणून भडगावातीलच लाडकूबाई प्राथमिक विद्या मंदिराच्या शिक्षिका सुनिता नारायण देवरे यांचेवर निलंबनाची कारवाई झाली. मतदान अधिकारी सुनिता देवरे यांचेवरील निलंबन कारवाईचा राग त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना आला. त्यांनी आपला राग लाडकूबाई प्राथमिक विद्यामंदिराच्या मुख्याध्यापकावर आणि एका शिक्षकांवर काढला. मुख्याध्यापकांना चांगलाच चोप देऊन सुनिता देवरेची मतदान अधिकारी म्हणून या केंद्रावर नियुक्ती का केली याचा जाब त्यांना विचारला. मुख्याध्यापकाने तोंड दाबून बुक्क्ेंचा मार खाल्ला. कारण या शाळेत ते मुख्याध्यापक म्हणून आहेत ती शाळा त्यांचीच संस्था आहे. त्यामुळे त्याची कुठेही वाच्यता केलेली नाही. पोलिसात जाऊन गुन्हा दाखल करण्याचे धाडस तर शक्यच नाही. कारण त्यांना मुख्याध्यापक म्हणून त्यांचेच संस्थेत काम करायचे आहे. या शिक्षकाला मारहाण झाली त्यांने घरात जाऊन आतून लावली म्हणून बचावले. एकंदरित बिहार- उत्तरप्रदेशातील गुंड मतदान केंद्र ताब्यात घेऊन मतदान केल्याच्या बातम्या आपण ऐकतो. परंतु मतदान केंद्रावर नियुक्त अधिकार्याांकडून झालेल्या चुकीमुळे आयोगाने निलंबनाची कारवाई केली म्हणून वड्याचे तेल वांग्यावर काढल्याचा प्रकार भडगावातील संबंधिताने केला आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकार्याांना हात लावण्याची त्यांची हिंमत नाही म्हणून बिचार्याा मुख्याध्यापक व शिक्षकांला मारहाण करून आपला कंड शमविला एवढेच परंतु या प्रवृत्तीलाही वेळीच ठेचून काढले पाहिजे. तर अशा प्रवृत्ती पुन्हा डोके वर काढणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.