बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे ट्रेसिंग वाढवा

0

भुसावळ येथील बैठकीत केंद्रीय समितीचे निर्देश

जळगाव – जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी कोरोना बाधित आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा तातडीने शोध घेऊन त्यांची तपासणी करावी. असे निर्देश केंद्रीय समितीने आज भुसावळ येथील बैठकीत दिले.

जिल्ह्यातील कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दोन सदस्यीय केंद्रीय समिती जिल्ह्याच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आलेली आहे. या समितीने आज दुस-या दिवशी येथील डॉ उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व भुसावळ येथे भेट देऊन येथील परिस्थितीची पाहणी करून माहिती जाणून घेतली व काही मार्गदर्शक सुचनाही केल्यात.

त्यानंतर भुसावळ येथील प्रांताधिकारी कार्यालयात सर्व शासकीय यंत्रणांची आढावा बैठक समितीने घेतली. यावेळी समितीचे प्रमुख डॉ. ए जी अलोने यांनी वरील निर्देश दिले.

या बैठकीस समितीचे सदस्य डॉ. एस डी खापरडे, जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष तथा इन्सिडेंट कमांडर गोरक्ष गाडीलकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, भुसावळचे उपविभागीय अधिकारी रामसिंग सुलाने यांचेसह विविध यंत्रणांचे तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते

यावेळी बोलताना डॉ. अलोने म्हणाले की, बाधित रूग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा तातडीने शोध घेऊन त्यांची तपासणी करावी तसेच या व्यक्तींमध्ये कोरोना संसर्गाची कोणतीही लक्षणे आढळून आल्यास त्यांचे स्वॅब घेण्यात यावे. व त्यांच्यावर तातडीने ट्रीटमेंटही सुरू करावी. जेणेकरून पुढील संसर्ग टाळणे शक्य होईल.

जिल्ह्यातील मृत्यूदर कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासना आवश्यक उपाययोजना राबवित आहे. नगरपालिकेनेही याबाबत तातडीने पावले उचलताना नागरिकांची घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करावी. या तपासणीत 60 वर्षावरील नागरिकांची तपासणी प्राधान्याने करावी. शिवाय अशा व्यक्तींना इतर कुठलेही आजार असल्यास त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देशही त्यांनी नगरपालिका प्रशासनास दिले. त्याचबरोबर प्रतिबंधित क्षेत्रात बाहेरील कोणाही नागरिकाची ये- जा होणार नाही याची दक्षता घ्यावी. याकरिता प्रतिबंधित क्षेत्रातील नागरीकांना आवश्यक त्या सोयी-सुविधा वेळेवर उपलब्ध होतील याची दक्षता घेण्याचे निर्देशही समितीने यावेळी दिले.

तत्पूर्वी समितीने डॉ उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय भेट देऊन तेथील कोविड रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी त्यांनी रुग्णालयात रुग्णांना मिळत असलेल्या सोयीसुविधा, उपचार यांचीही माहिती जाणून घेतली. तसेच रुग्णांवर उपचार वेळेत होण्याबाबत काही मार्गदर्शक सूचना देखील केल्यात. रुग्णालयात रुग्णांना देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत समितीने समाधान व्यक्त केले. यावेळी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अर्विकर, रजिस्टर प्रमोद भिरूड, वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रय्या कांते आदी उपस्थित होते.

यानंतर समितीने साकेगाव येथील कोविड केअर हॉस्पिटलला भेट दिली तसेच भुसावळ येथील ट्रामा केअर सेंटरला भेट देऊन तेथे नॉन कोविड रुग्णांना मिळणाऱ्या सुविधा व उपचार यांची पाहणी केली. त्यानंतर समितीने भुसावळ शहरातील भोईवाडा येथील प्रतिबंधित क्षेत्राला भेट देऊन तेथीलही पाहणी करून काही सुचना केल्यात.

00000

Leave A Reply

Your email address will not be published.