बँक निवडणुकीतून भाजप माघारीचा अन्वयार्थ

0

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या संदर्भात गेले दोन महिने चाललेले सर्वपक्षीय पॅनलचे गुऱ्हाळ थांबले. काल उमेदवारी माघारीच्या अंतिम तारखेला चित्र स्पष्ट झाले. त्याआधी भाजपच्या दिग्गज नेत्यांचे उमेदवारी अर्ज बाद झाल्याने भाजपला पहिला धक्का बसला. त्यानंतर एकूण 21 संचालकांच्या निवडणुकीसाठी भाजपकडे उमेदवारच नव्हते. त्यामुळे निवडणूक लढवून आपली फजिती करून घेण्यापेक्षा ही निवडणूकच लढवायची नाही. सत्ताधारी आघाडीच्या दबावाचा निषेध करून या निवडणुकीतून भाजप आपल्या सर्व उमेदवारांचे उमेदवारी अर्ज माघारी घेतले जात असल्याची घोषणा माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांनी केली. ही घोषणा करत असतांना गिरीश महाजन यांनी जिल्हा बँक ही सर्वसामान्य शेतकऱ्यांची राहिलेली नाही. ती धनदांडग्याची बँक झालेली आहे. यामध्ये संचालक मंडळानी शेतकऱ्यांना कर्ज देण्याऐवजी स्वतः कर्ज घेतलेले आहेत. अनेक बाबतीत अनियमितता झालेली आहे. सामान्य शेतकरी मात्र भरडला जातोय. अनेक ठराव बेकादेशिर केलेले आहेत. अशा ठरावाला मी संचालक म्हणून विरोध दर्शविला आहे. त्यामुळे यापुढे बँकेच्या आर्थिक व्यवहाराबाबत भाजपतर्फे लढा पुकारणार असल्याचेही गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले.

जिल्हा बँक निवडणुकीच्या संदर्भात भाजपतर्फे हा मोठा निर्णय म्हणता येईल. भाजपने घेतले त्या या निर्णयामागे अनेक अर्थ दडलेले आहेत. जिल्हा बँक निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनेल झाले असते तर भाजपला 7 जागा आणि सव्वा वर्ष चेअरमन- व्हा.चेअरमन मिळाले असते. परंतु सर्व पक्षीय पॅनेलमध्ये भाजपला स्थान आमचे नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे नाव पुढे करून पहिली ठिणगी टाकली गेली. माजी मंत्री एकनाथराव खडसेंना हे हवेच होते. भाजपला सर्व पक्षीय पॅनलमधून वगळल्याने आ.गिरीश महाजनांची गोची केली गेली. त्यानंतर उमेदवारी अर्जाच्या छाननीत भाजपला धक्का बसला. अनेक दिग्गजाचे अर्ज बाद झाले. त्यामुळे काही बोटावर मोजण्याइतके 2-3 भाजपचे उमेदवार निवडून येथील अशी स्थिती स्पष्ट दिसत होती. त्यामुळे निवडणूक लढवून हसे करून घेण्यापेक्षा निषेध करून आम्ही माघार घेवून निषेध करून आम्ही माघार घेवून निवडणुकीवरच बहिष्कार टाकल्याने ठाकुरकी राहिली. निवडणूकीतून माघार घेतल्यानंतर बँकेच्या कामकाजावर अथवा भ्रष्टाचारावर हल्लोबोल करण्याची घोषणा करून सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या बाजूने भाजप आहे ही सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे राजकारण नको शेतकऱ्यांची बँक म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी राजकारणाचे जोडे बाहेर काढून एकत्र येवू अशा गोंडस विचार पुढे केला गेला. परंतु भाजपला पहिला शह दिला. गेला ते काँग्रेस पक्षाने भाजपबरोबर एकत्र येवू नये असा वरिष्ठ काँग्रेस नेत्यांचा तात्विक विचार असल्याने सर्वपक्षीय पॅनेलमध्ये भाजप असेल तर काँग्रेस सर्वपक्षीय पॅनेलमध्ये राहणार नाही. काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही धूसफूस सुरु झाली. भाजपला सर्वपक्षीय पॅनलेमध्ये स्थान दिल्यानंतर राष्ट्रवादीचे उमेदवारांवर अन्याय होईल हा विचार घेवून अजित पवारांचे नाव पुढे करून भाजपला विरोध दर्शविला. त्याचबरोबर भाजप 7 आणि शिवसेना 5 असे एकूण 12 उमदेवार भविष्यात एकत्र आले तर राष्ट्रवादी अल्प मतात येईल ही भिती सुध्दा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनात आले. म्हणून सुध्दा भाजपला राष्ट्रवादीचा अंतर्गत विरोध सुरु झाला. त्यातच कोअर कमेटीच्या बैठकांमध्ये सर्वपक्षीय पॅनेलसाठी एकमत झाले नाही.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बँक निवडणुकीसाठी सर्वपक्षीय पॅनेल व्हावे याबाबत प्रामाणिक इच्छा होती. परंतु त्यांना यश आले नाही. दोन महिने सर्वपक्षीय पॅनेलच्या संदर्भात भाजपचे आ.गिरीश महाजन यांनी मागे मनपा निवडणुकीत जे पेरले ते उगवले जळगाव मनपा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती होणार म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेनेला झुलवत ठेवले. शेवटच्या क्षणी जागा वाटपावरून युती शक्य झाली नाही म्हणून भाजपने शिवसेनेला धोका दिला. तीच परिस्थिती जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनलच्या संदभात महाजनांना अनुभवाला आली. जे परले तेच उगवले ही म्हण तंतोतंत प्रत्यक्षात उतरली.

Leave A Reply

Your email address will not be published.