प्रसिद्ध अभिनेत्यावर गुन्हा दाखल; पत्नीला मारहाणीचे आरोप

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अनिकेत विश्वासरावसह त्याच्या आईवडिलांविरोधात पत्नी स्नेहा चव्हाणने कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती अनिकेत विश्वासराव, सासरे चंद्रकांत विश्वासराव आणि सासू अदिती विश्वासराव या तिघांविरोधात स्नेहाने तक्रार दाखल केली.

काय आहे प्रकरण ?

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार स्नेहा हिने तक्रारीत म्हटले की, अनिकेत विश्वासराव याने मुंबईतील दहिसर येथील विश्वासराव रेसिडेन्सी येथे १० डिसेंबर २०१८ ते २ फेब्रुवारी २०२१ दरम्यान कुटुंबाच्या मदतीने मानसिक, शारीरिक छळ करत मारहाण केली. तीन वर्षाच्या काळात सिनेमा सृष्टीत आपल्यापेक्षा पत्नीच नाव मोठ होईल, या भीतीने अनिकेतने जीवे मारण्याची धमकी दिली. याशिवाय गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. अनेकदा नातेवाईकांसमोर अपमानास्पद वागणूक देत छळ केला, तसेच सासू, सासरे यांनीही तिच्यावर होणाऱ्या अत्याचार न थांबवता त्या गोष्टींसाठी अनिकेतला पाठींबा दिला असं आपल्या तक्रारीत नमूद केलेय.

या तक्रारीनुसार, आता अभिनेता अनिकेत विश्वासराव, सासरे चंद्रकांत विश्वासराव आणि सासू अदिती विश्वासराव यांच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अलंकार पोलिसांनी अनिकेतसह त्याचे आई-वडील यांच्यावर ४९८ अ, ३२३, ५०४, ५०६ अशा कलमांखाली गुन्हा दाखल करुन घेतला आहे.

अनिकेत विश्वासराव आणि स्नेहा चव्हाण २०१८ साली विवाहबंधनात अडकले. स्नेहा चव्हाण देखील एक अभिनेत्री असून अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलेय. स्नेहा चव्हाणची आई राधिका चव्हाण या देखील मराठीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. मात्र स्नेहा आणि अनिकेतमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु होते. यामुळे फेब्रुवारी २०२१ मध्ये स्नेहा माहेरी पुण्यात राहत होती. याच छळाला आणि त्रासाला कंटाळून स्नेहाने पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.