पुन्हा वॉटरग्रेस ठेकेदारीची चर्चा…!

0

जळगाव शहरातील स्वच्छतेचा ठेका दिलेल्या वॉटरग्रेस कंपनीच्या संदर्भात ठेका दिल्या दिवसांपासून आरोप – प्रत्यारोप होत आहेत. मध्यंतरी एक वर्षभर त्याबाबतची चर्चा थांबलेली होती. तथापि आता पुन्हा वॉटरग्रेसच्या कामकाजाबाबत माजी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांनी मनपा प्रशासनाला जोरदार इशारा दिला आहे. सदर वॉटरग्रेस कंपनीला पाठीशी घालून पैशाची लूट केली जातेय. या पैशाच्या लुटीवर पडदा टाकण्यासाठी मनपातर्फे कागदी घोडे नाचवले जातात. मनपाने हा प्रकार थांबवला नाही तर त्याला आमच्या स्टाईल उत्तर दिले जाईल, असा गर्भित इशाराही डॉ. अश्वीन सोनवणे यांनी दिला आहे.

ईपेपर लिंक👇

http://epaper.lokshahilive.com/fullview.php?edn=Main&artid=LOKSHAHI_MAI_20211211_-05_2

 

महापालिकेला डॉ. अश्विन सोनवणे यांनी इशारा दिला तेव्हा त्यांनी शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग साचले असून जिकडे – तिकडे कचरा पसरलेला असतांना कचरा उचलण्याची आकडेवारी मात्र फुगवून दाखविण्यात येते. यामागचे इंगित काय? असा सवालही डॉ. सोनवणे यांनी केला आहे. वॉटरग्रेस कंपनीला स्वच्छतेचा ठेका देण्याआधी शहरातून 230 ते 250 टन कचरा दररोज उचलला जात होता. वॉटरग्रेसला ठेका दिल्यानंतर या कंपनीने हा आकडा वाढवून दाखवण्यात येतो.  ही मनपा प्रशासनाची चक्क फसवणूक आहे. धूळफेक केली जातेय.

डॉ. सोनवणे यांच्या या आरोपात तथ्य आहे. कारण कचऱ्याचे वजन वाढविण्यासाठी वॉटरग्रेस कंपनीकडून कचऱ्यात दगड, वाळू आणि माती भरण्यात येते हे रंगेहात पकडून दाखवले आहे. त्यामुळे वॉटरग्रेसला पाठीशी घालण्याचे कारण काय? पाणी कुठेतरी मुरतेय हा ठेका ज्यावेळी महानगरपालिकेत भाजपची सत्ता होती त्यांचे कारकिर्दीत दिलेला आहे. त्यावेळी टक्केवारीमध्ये जे नगरसेवक वंचित राहीले त्यांनी वॉटर ग्रेस कंपनीच्या कामकाजाबाबत आवाज उठवून त्याचा भंडाफोडही केला. परंतु  या ठेकेदाराचे हात लांबवर पोहोचल्याने कितीही ओरड झाली तर त्याचा ठेका काही रद्द होऊ शकला नाही. माजी पालकमंत्री आणि महापालिकेवर ज्यांचे वर्चस्व होते ते गिरीश महाजन यांचे वरदहस्त या वॉटरग्रेस कंपनीवर असल्याने त्या ठेकेदारांचे काहीही वाकडे होऊ शकले नाही.

भाजपची सत्ता असतांना वॉटरग्रेस कंपनीच्या विरोधात ओरडणारे आताचे सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवक आणि पदाधिकारी आता गप्प का आहेत हे न कळण्याइतकी जनता खुळी नाही. त्यामुळे अ ची सत्ता जाऊन ब ची सत्ता आली काय? सत्ताधारी सगळे सारखेच असे म्हटले तर त्यात वावगे काय? 75 नगरसेवकांचे संख्याबळ असलेल्या महापालिकेत 57 नगरसेवकांचे पाशवी बहुमत भाजपकडे होते. भाजपने शहर विकासच्या संदर्भात जी जी आश्वासने दिली होती ती त्यांच्या अडीच वर्षाच्या कालावधीत पूर्ण केली नाहीत. त्यामुळे शहरवासीय कमालीचे नाराज होते. त्याचबरोबर सत्ताधारी भाजपातील बहुसंख्य नगरसेवकही नाराज असल्याने ते भाजपतून बाहेर पडून शिवसेनेशी हातमिळवणी करून सत्ता बदल किंवा शिवसेनेचा भगवा महापालिकेवर फडकला. जळगावकरांच्या आशा पल्लवित झाल्या. परंतु येरे माझ्या मागल्या अशीच स्थिती पुन्हा सुरू झाली.

महापालिकेवर भगवा फडकल्यानंतर नवीन महापौर -उपमहापौर पदाधिकारी तसेच नगरसेवकांकडून अपेक्षा वाढल्या. परंतु त्या अपेक्षा फोल ठरल्या. शहरातील खड्ड्यांच्या रस्त्यांचा प्रश्न आ वासू उभा आहे. रस्त्यांमुळे जनता त्रस्त झाली असून रस्त्यांची कामे आता लवकरच सुरू होतील. 46 कोटी रूपयांच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. त्यावरील स्थगिती उठविली आहे  आणि 60 कोटी रूपये मंजूर होतील. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रयत्नाने तो मार्ग मोकळा झालाय. नगरविकास  मंत्री एकनाथ शिंदे यांना पालकमंत्री भेटले. आता मार्ग मोकळा झाला. असे वारंवार सांगून जनतेच्या तोंडाला पाने पुसले जातात. परंतु प्रत्यक्षात कामकाज सुरू झाले तरच ते सत्यात उतरेल. ज्या वॉटरग्रेस कंपनीचे कनेक्शन रायसोनी पतपेढीच्या घोटाळ्यात सामील असलेल्या आरोपी सुनिल झंवर यांचेशी असल्याची चर्चा गाजली.

सुनिल झंवरच्या कार्यालयातून वॉटरग्रेस कंपनीचा कारभार चालत होता. पॉलिसी तपासातून हे सिध्द झाले. सुनिल झंवर आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या मैत्रीचे कनेक्शन सर्वश्रुत आहे, तथापि विद्यमान शिवसेनेचे सत्ताधारी नगरसेवक आणि पदाधिकारी आता गप्प का आहेत. या मागचे इंगित काय? सत्ताधारी झंवर यांचे लाभार्थी झाले आहेत का? असा प्रश्न जर कुणी विचारला तर त्यात गैर काय? त्यामुळे वॉटरग्रेस कंपनीच्या ठेकेदाराच्या नावाने बोटे मोडण्यात काहीही अर्थ नाही.

सदर ठेकेदाराकडून नगरसेवकांना खुश केले जात असेल तर रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साचले काय? रस्त्यावर कचरा इतस्त: पडला काय? आणि कचऱ्याचे वजन वाढवून दिले काय? त्याबाबत या नगरसेवकांना बोलण्याचा नैतिक अधिकार नसल्याने ते बोलू शकत नाहीत. त्यामुळे महानगरपालिकेची ठेकेदाराकडून लूट केली तर या नगरसेवकांचे जातेय काय? त्यामुळे ही आर्थिक लूट मनपा प्रशासनाकडून थांबवले तर आमच्या स्टाईलने उत्तर देऊ असा इशारा नगरसेवक डॉ. अश्विन सोनवणे देतात त्यात त्यांचे चुकले काय? जळगाव जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचेकडे पाणी पुरवठाबरोबरच स्वच्छता खातेसुध्दा आहे. त्यामुळे थोडे जातीने लक्ष घालून वॉटरग्रेस कंपनीच्या संदर्भात सत्य बाहेर काढले तर जनता त्यांना धन्यवाद देतील.

Leave A Reply

Your email address will not be published.