पीजे रेल्वे आमच्या अस्तित्वाची लढाई असुन सदैव कृती समितीच्या पाठीशी- आ. किशोर पाटील

0

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क

जळगांव लोकसभेचे खासदार उन्मेश पाटील यांनी गेल्या १५ दिवसांपूर्वी पाचोरा – जामनेर (पीजे) रेल्वे हलवु देणार नाही असे आश्वासित केले होते. पीजे रेल्वे पुर्ववत सुरू करण्यासाठी पीजे रेल्वे कृती समिती सदस्यांना सोबत घेऊन डी. आर. एम. किंवा दिल्ली येथे जावुन थेट केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची भेट घेवु असेही आश्वासन खा. उन्मेष पाटील यांनी दिले होते.

परंतु दरम्यानच्या काळात पीजे रेल्वे सुरु होण्याच्या विषयावर विरजन पडले. पीजे रेल्वे ही पाचोरा व जामनेर तालुक्यातील गोर – गरिबांची व पाचोरा जंक्शन स्थानकाची अस्तित्वाची लढाई असुन ही रेल्वे पुन्हा सुरु करण्यासाठी वेळ पडल्यास रेल्वे रोको आंदोलन करावे लागले तर मी सदैव आपल्या पाठीशी आहे. जो पर्यंत पीजे रेल्वेचे ब्राॅड गेजचे काम बोदवड पासुन सुरु होत नाही तो पर्यंत पीजे रेल्वेची कुठलीही वस्तु संबंधित काॅन्ट्रेक्टरने उचलु नये. असा इशारा ही आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा पिपल्स बॅंके समोरील पीजे बचाव कृती समितीच्या धरणे आंदोलनास पाठिंबा देतांना दिला.

रेल्वे प्रशासनाने कायमस्वरूपी बंद केलेली पाचोरा ते जामनेर (पीजे) रेल्वे पुन्हा सुरू करण्यासाठी पीजे बचाव कृती समितीच्या वतीने पाचोरा, जामनेरसह पाच गावात एकाच वेळी दि. १५ जानेवारी रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत धरणे आंदोलन करण्यात आले. या धरणे आंदोलनास माजी आमदार दिलीप वाघ, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, वकील बार असोसिएशन, सराफ असोसिएशन, डाॅक्टर्स असोसिएशन, एकता ऑटो चालक – मालक संघटना, पाचोरा तालुका शिक्षण संस्था, विद्यार्थी संघटना यांनी जाहीर पाठिंबा दिला असुन पाचोरा पिपल्स बॅंकेसमोर सुरू असलेल्या धरणे आंदोलनात कृती समितीचे खलील देशमुख, विलास जोशी, अॅड. अविनाश भालेराव, पप्पु राजपुत, दिपक आदिवाल, भरत खंडेलवाल, नंदकुमार सोनार, अॅड. आण्णा भोईटे, सुनिल शिंदे, प्रा. गणेश पाटील, मनिष बाविस्कर, शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख अरुण पाटील, रणजीत पाटील, अनिल (आबा) येवले सह पीजे बचाव कृती समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.