पार्किंगचा स्लॅब कोसळून ७ मजूर जखमी

0

पिंपरी, लोकशाही न्यूज नेटवर्क 

ॲवॉन विस्टा कन्स्ट्रक्शन साईट, मुंबई-बेंगळुरू महामार्ग, वाकड येथे शनिवारी (दि.३०) बांधकाम प्रकल्पाच्या पोडीयम पार्किंगचा स्लॅब कोसळून सात मजूर जखमी झाले. ही घटना रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली.

नंदू हरी निषाद (वय २९), कार्तिक रुपराय निषाद (वय १८), राजेशकुमार गणीराम यादव (वय २१), दुर्गेश लक्ष्मीनारायण निषाद (वय ३०), रवीशंकर बिधीलाल साहू (वय ३०), लक्ष्मणकुमार (वय २२), रामरतन निषाद (वय २७, सर्व रा. लेबर कॅम्प, ॲवॉन विस्टा कन्स्ट्रक्शन साईट, मुंबई-बेंगळुरू महामार्ग, वाकड, मूळ रा. चकरमाठा, जि. बिलासपर, छत्तीसगड), अशी जखमी झालेल्या मजुरांची नावे आहेत.

साईराज बिल्डकॉनचे सिनिअर इंजिनिअर देवेंद्र गायकवाड, ज्यूनिअर इंजिनिअर अजय ढगे, साईट सुपरवायझर तरुण मालदार यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक अशोक निमगिरे यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथे मुंबई-बेंगळुरू महामार्गालगत ॲवॉन विस्टा कन्स्ट्रक्शन साईट या बांधकाम प्रकल्पाच्या पोडीयम पार्किंगच्या स्लॅबचे बांधकाम करण्यात येत होते. स्लॅब टाकण्यासाठी उभारलेले सपोर्टिंग स्टेज हे स्लॅबच्या आकारमानानुसार वजन पेलण्या इतपत मजबूत नसताना आरोपींनी मजुरांना स्लॅबचे बांधकाम करण्यास सांगितले. हा स्लॅब कोसळून बांधकाम करणाऱ्या मजुरांना दुखापत झाली.

सुरक्षेबाबत योग्य उपाययोजना न करता हयगयीचे व निष्काळजीपणाचे कृत्य करून मजुरांच्या जिवीतास धोका निर्माण होण्यास आरोपी कारणीभूत झाले, असे फिर्यादीत नमूद आहे. दरम्यान, स्लॅब कोसळल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. जखमी झालेल्या मजुरांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.